निधीच्या प्रतीक्षेत शहरातील तीनही ऐतिहासिक पूल मोजताहेत शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:34 PM2020-08-08T13:34:12+5:302020-08-08T13:39:31+5:30
शहराच्या पश्चिमेला खाम नदीवर मकईगेट, महेमूदगेट आणि बारापुल्लागेट या तीनही दरवाजांना लागून असलेले पूल सुमारे ३०० ते ३५० वर्षांपूर्वीचे आहेत.
औरंगाबाद : शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांना लागून असलेल्या पुलांपैकी पाणचक्कीलगत महेमूदगेट, मकईगेट आणि बारापुल्ला गेटलगतच्या पुलांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात २१ कोटी रुपयांची तरतूद केली; पण अद्याप निधी मंजुरीचा आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्प व बांधकाम विभागाचे अधिकारी हतबल झालेले आहेत.
तथापि, तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मागील सरकारच्या काळात मंजूर करून घेतलेल्या निधीतून बारापुल्ला गेटलगतच्या पुलाचे काम जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले आहे. गेटला वळसा घालून जुन्या पुलाला समांतर नवीन पुलाचे काम सध्या बांधकाम विभागामार्फत केले जात आहे. ऑक्टोबरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज कार्यकारी अभियंता भगत यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील या तिन्ही गेटला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे गेट व त्यांना लागून असलेल्या पुलांच्या संवर्धनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून अर्थसंकल्पात निधी मंजूर करून घेतला होता. त्या दृष्टिकोनातून सध्या बारापुल्लागेटला बाह्यवळसा घालून नवीन पुलाचे काम सुरू असले, तरी गेटमधून गेलेल्या जुन्या पुलाच्या संवर्धनासाठी तो पाडून त्याठिकाणी नवीन पूल उभारण्याची तरतूदही मंजूर २१ कोटी रुपयांच्या मंजूर तरतुदीमध्ये आहे.
शहराच्या पश्चिमेला खाम नदीवर मकईगेट, महेमूदगेट आणि बारापुल्लागेट या तीनही दरवाजांना लागून असलेले पूल सुमारे ३०० ते ३५० वर्षांपूर्वीचे असून, ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये वाहतुकीसाठी हे पूल धोकादायक असल्याचा इशारा दिल्यानंतरही त्यावरून चोवीस तास वाहतूक सुरू आहे. या पुलांच्या बांधकामाबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीबाबत मंजुरी आदेश जारी झालेला नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
घाटीचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो
महेमूदगेटला बाह्यवळसा घालून समांतर नवीन पूल करता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यासाठी गेल्या महिन्यात खासदार इम्तियाज जलील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत आदींनी तेथे भेट दिली होती. तेव्हा जुन्या पुलाच्या बाजूने गेलेली पाईपलाईन व विजेचे खांब, तारा शिफ्ट करण्याचा मुद्दा समोर आला.त्यानुसार खासदार जलील यांनी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची भेट घेतली. तेव्हा सध्या घाटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आताच पाईपलाईन शिफ्ट करण्याचे काम हाती घेतले, तर घाटी हॉस्पिटलचा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना खासदार जलील यांनी सांगितले.