एकच नाव, तेही सर्वमान्य; वाल्मिक सरवदे यांची पूर्णवेळ प्रकुलगुरुपदी निवड
By राम शिनगारे | Published: February 10, 2024 11:53 AM2024-02-10T11:53:40+5:302024-02-10T11:54:37+5:30
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरुपदी निवड केली होती.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पूर्णवेळ प्रकुलगुरुपदासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांचे नाव मांडले. त्यास सर्वच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी मान्यता दिली. त्यानंतर विविध निवड समित्यांवर व्यवस्थापन परिषदेवर सदस्यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. त्याशिवाय आर्थिक विषयाच्या संदर्भात एक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरुपदी निवड केली होती. या निवडीस ४८ तास होण्यापूर्वीच त्यांचा पदभार काढण्याचे आदेश मुंबईत पोहोचल्यानंतर दिले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. त्याशिवाय आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनीही कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्या पुनर्नियुक्तीची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नियमित प्रकुलगुरूंच्या निवडीची विषय ठेवला होता. त्यात कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. सरवदे यांच्या नावाची शिफारस केली. त्यास सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली. डॉ. सरवदे यांना बैठक संपताच निवडीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी प्रकुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला.
विविध समित्यांवर सदस्यांची निवड
व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांतून महत्त्वाच्या खरेदी समितीवर ॲड. दत्ता भांगे यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय परीक्षा मंडळावर प्राचार्यांतून डॉ. नवनाथ आघाव, डॉ. प्रशांत चौधरी, विद्यापीठातून डॉ. चंद्रकांत कोकाटे, महाविद्यालयातून डॉ. अशोक कोरडे यांची निवड केली. कुलसचिव व आजीवन संचालकांच्या निवड समितीवर डॉ. व्यंकटेश लांब, ग्रंथालय संचालकासाठी प्राचार्य डॉ. गौतम पाटील, परीक्षा संचालकासाठी डॉ. रविकिरण सावंत, नवोपक्रम संचालकासाठी डॉ. अपर्णा पाटील, उपपरिसर संचालकासाठी डॉ. अंकुश कदम यांची तर अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांची निवड केली आहे.
तंत्र व उच्च शिक्षण संचालकांची हजेरी
कुलगुरू डॉ. फुलारी यांची पहिलीच बैठक असल्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी पहिल्यांदाच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. प्रकुलगुरूंची निवड होणार असल्यामुळे कोणतीही गडबड होऊ नये यासाठीच संचालकांना वरिष्ठ पातळीवरून पाठविले. प्रकुलगुरूंचे नावही बंद लिफाफ्यात संचालकच घेऊन आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.