औरंगाबाद : वर्षावासानिमित्त २९ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर दरम्यान मोफत जपानी स्पोकन क्लास, ध्यान व प्रवचन वर्ग आयोजित करण्यात आले असून यासाठी जपानचे हॅपी सायन्सचे बौद्ध धर्मगुरू तकाहिरो एदा हे मार्गदर्शन करणार आहेत. हे क्लासेस बुद्ध लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमी येथे घेतले जाणार आहेत. ( Want to learn Japanese? Free classes starting tomorrow at Buddha Caves Aurangabad)
जपान हे सर्वात प्रगत बौद्ध राष्ट्र आहे. या देशाची भाषा आत्मसात केल्यामुळे भारतीय व जपानी सांस्कृतिक मूल्यांची देवाण-घेवाण करण्यास मदत होईल. जपानचा धम्म समजण्यास मदत होईल. भारतातील व जपानमधील आंतरराष्ट्रीय उद्योगांत रोजगार मिळण्यास मदत होईल, हा यामागचा उद्देश असल्याचे भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर यांनी कळविले आहे.
ध्यान व प्रवचन तसेच जपानी स्पोकन वर्गाचे मराठी, हिंदी, इंग्रजी दुभाषकाचे काम हॅपी सायन्सचे भारतीय प्रमुख सुहास काळवे हे करणार आहेत. हे तिन्ही उपक्रम बुद्ध लेणीच्या पायथ्याशी विहारात दर रविवारी दुपारी २ ते ३ तसेच दर बुधवार आणि शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ यावेळात आठवड्यातून तीन दिवस राहतील. हे मोफत वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे घेतले जातील.
रविवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. कोविडमुळे ऑफलाइन वर्गामध्ये प्रवेश मर्यादित राहतील. ऑनलाइन वर्गामध्ये अशी कुठलीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे जास्तीत जास्त औरंगाबादकर व महाराष्ट्रातील भाषाप्रेमी व ध्यान साधकांनी उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. भन्ते चंद्रबोधी यांनी केले आहे.
ऑनलाईन-ऑफलाईन सत्रात सहभागी होण्यासाठी bcbodhi@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.