मूल दत्तक घ्यायचंय; कशी कराल ऑनलाइन नोंदणी ?
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 17, 2023 08:04 PM2023-11-17T20:04:16+5:302023-11-17T20:04:27+5:30
मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : लग्न होऊन ३ ते ५ वर्षे झाली, पण घरात पाळणा हलला नाही. अशा वेळेस मूल दत्तक घेण्याची चर्चा सुरू होते. मात्र, मूल कसे, कुठून दत्तक घ्यायचे, यासाठी कोणती संस्था कार्य करीत असते का, ही प्रक्रिया कशी पार पाडली जाते, याची माहिती त्या दाम्पत्यांना नसते. यासंदर्भात तुम्ही ऑनलाइन माहिती जाणून घेऊ शकतात. किंवा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण मंडळ अथवा शहरातील अनाथालय असो वा प्रसूतिगृहात याची सविस्तर माहिती मिळू शकते.
ऑनलाइन नोंदणी कोठे कराल?
मूल दत्तक घेण्याचा दाम्पत्यांचा विचार पक्का करणे आवश्यक आहे. या दत्तकइच्छुक पालकाने त्यानंतर www.cara.wcd.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी. अर्ज व त्यासोबत लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
कागदपत्रे कोणती लागतात
वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे- त्यांचा वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्यांचे फोटो, त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड व ते ज्या शहरात राहतात तेथील जवळील कायदेशीररीत्या दत्तक विधान पूर्ण करणाऱ्या संस्थेचे नाव अपलोड करावे लागते. त्यानंतर नावनोंदणी होते.
दत्तक विधान संस्था कशी करते काम?
कायदेशीररीत्या दत्तक विधान करणारी संस्था निवडल्यानंतर ती संस्था मूल दत्तक देण्यासंदर्भात पुढील कार्य सुरू करते. संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते त्या मूल दत्तक इच्छुक पालकांच्या घरी भेट देते. त्या दाम्पत्यांचे कौन्सिलिंग करतात. त्यानंतर एक अहवाल तयार केला जातो. त्यात काय आढळून आले व त्या दाम्पत्यांना मूल दत्तक द्यायचे की नाही, हे त्या अहवालात नमूद केले जाते. मूल दत्तक घेण्यासाठी ते दाम्पत्य पात्र असेल तर त्याचा अहवाल जिल्हा परिवेक्षा अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. ते अहवाल वाचून सही करतात व तो अहवाल नंतर बेवसाइटवर अपलोड करतात. मग ते दाम्पत्य तिथे मूल दत्तक मिळेपर्यंत प्रतीक्षा यादीत असते.
किती काळ करावी लागते वेटिंग?
मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. साधारण: नोंदणीपासून साडेतीन ते चार वर्षे पालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
दाम्पत्यांना कोणत्या वयाचे मूल द्यायचे हे कसे ठरते?
दाम्पत्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज करून त्यानुसार त्या दाम्पत्यांना किती वर्षे वयाचे मूल दत्तक द्यायचे हे ठरविले जाते. यात दाम्पत्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज ९० वर्षांच्या आत असेल तर त्यांना तीन महिन्यापासून ते दोन वर्षे वयाचे बाळ दत्तक दिले जाते. जर दोघांच्या वयाची बेरीज ११० पेक्षा अधिक असेल तर त्यांना १८ वर्ष वयापर्यंतचा मुलगा-मुलगी दत्तक घेता येऊ शकेल.