पाणीपुरवठ्यात सुधारणेसाठी वॉर रूम, खास पथके स्थापन; अर्धी महापालिका लागली कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:44 PM2022-05-11T17:44:11+5:302022-05-11T17:44:53+5:30
प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना
औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अर्धी महापालिका कामाला लावण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट सिटीत खास वॉर रूम स्थापन करण्यात येत असून, मनपाच्या ९ झोनसाठी पालक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. वितरण व्यवस्था, व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले. विविध शासकीय कार्यालयांमधील ८ निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पाणीपुरवठ्याबाबत मनपा अधिकाऱ्यांसोबत पाण्डेय यांनी बैठक घेतली. बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले. शहराला चार भागात विभागण्यात आले. प्रत्येक विभागाला एक उपअभियंता देण्याचा निर्णय झाला. ढोरकीन पंप हाऊस येथे बूस्टर बसविण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाला उपायुक्त संतोष टेंगळे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे मार्गदर्शन करतील. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन अधिकारी असतील.
पाणीपुरवठ्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले. पाण्याची गळती रोखण्यासाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक काम करेल. जायकवाडी येथील पंपगृहातील पंपाच्या स्टेनरमध्ये गवत इ. मुळे चोकअप आहे का, याची तपासणी पाणबुड्यांमार्फत करून घेण्यात आली. जायकवाडी ते फारोळा या जलवाहिनीवर कर्मचाऱ्यामार्फत गस्त सुरू आहे. फारोळा येथील पंपाची रेट्रो फिटिंग व ढोरकीन येथे नवीन पंप बसविण्याचे काम सुरू आहे.
५ एमएलडी पाण्याची बचत
गुंठेवारी भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. मनपाने नेमलेल्या कंत्राटदाराचे टँकर आता एन-१ येथील एमआयडीसीच्या केंद्रावरून टँकर भरत आहेत. त्यामुळे एन-५ आणि एन-७ येथील टाक्यांवरील किमान ५ एमएलडी पाण्याची बचत होत आहे.
‘एसटीपी’च्या पाण्याचा वापर
बांधकामासाठी पूर्वी मनपाकडून पाणी देण्यात येत नव्हते. ज्यांना बांधकामासाठी पाणी हवे असेल, त्यांना नक्षत्रवाडी येथील मल -जल प्रक्रिया केंद्रातील शुद्ध केलेले पाणी देण्यात येईल. मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी अफसर सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या पाण्याचा उपयोग होत आहे.
संवेदनशील पाण्याच्या टाक्या
शिवाजीनगर, सूतगिरणी, पुंडलिकनगर, ज्युबिली पार्क व वेदांतनगर येथील पाण्याच्या टाक्या संवेदनशील आहेत. या ठिकाणी अनेकदा आंदोलने होतात. या ठिकाणी माजी सैनिक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.