औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; दरमहा कोट्यवधी रुपयांची उलाढाल, असा होतो पाण्याचा काळाबाजार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 08:15 PM2022-04-11T20:15:56+5:302022-04-11T20:16:12+5:30
वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पाण्यावर अक्षरश: दरोडा टाकण्यात येत आहे. महापालिकेने नियुक्त केलेला कंत्राटदार, पाण्याच्या टाक्यांवर नियुक्त केलेले कर्मचारी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा चालक यांच्या संगनमताने पाण्याचा काळाबाजार कशा पद्धतीने चालतो, याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
शहरात सध्या सर्वत्र पाण्यासाठी प्रचंड ओरड होत आहे. नागरिकांच्या हक्काचे टँकरचालक नेत आहेत. पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा, बीड बायपास येथील हॉटेल व्यावसायिकांना पाणी विकण्यात येत आहे. कोटला कॉलनी पाण्याच्या टाकीवरून तब्बल १२ हजार लीटरचे टँकर पहाटे ४ वाजेपासून भरून विकण्यात येतात, अशीही धक्कादायक माहिती आहे.
टाकीवरील कर्मचारी मालामाल
महापालिकेने ८० पेक्षा अधिक टँकर नेमले आहेत. कोटला कॉलनी, एन-५, एन-७, नक्षत्रवाडी येथून टँकर भरले जातात. एक टँकर किमान ७ फेऱ्या करतो. जास्तीतजास्त ९ फेऱ्याही होतात. काळ्याबाजारात टँकर नेण्यासाठी टाकीवरील कर्मचारी एका फेरीचे १०० रु. घेतो. दिवसभरात किमान १०० फेऱ्यांचे १० हजार रु. तो खिशात घालतो. महिना ३ लाख रुपयांची कमाई एक कर्मचारी करतो, हे विशेष.
कंत्राटदाराचे बिल दरमहा ५० लाख
महापालिका कंत्राटदाराला किलोमीटरनुसार पैसे देते. ८० टँकरचे बिल दरमहा किमान ५० ते ५५ लाख रु. होते. वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही, हे विशेष.
टँकरचालकांची वेगळी कमाई
टँकरचालक ज्या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करतात तेथे ५० रुपये ड्रमप्रमाणे पाणी राजरोसपणे विकतात. त्याचप्रमाणे अनेक नागरिक मनपात येऊन पैसे भरू शकत नाहीत. एका ग्रुपचे १८ ते २० हजार रुपये टँकरचालक मनपात भरतो, म्हणून स्वत:कडेच ठेवून घेतात. चोरून आणलेले पाणी नंतर त्यांना देत असतात.
‘लोकमत’चा दणका
मनपाने नियुक्त केलेले टँकरमाफिया पाण्याचा कशा पद्धतीने काळाबाजार करीत आहेत, यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारपासून वृत्तमालिका सुरू केली. याची दखल घेत मनपा प्रशासनाने प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांची उचलबांगडी केली. पाणीपुरवठ्यात अनेक वर्षे काम केलेले निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे कंत्राटी पद्धतीवर मनपात आहेत. त्यांच्याकडे पूर्ण अधिकारासह पाणीपुरवठा विभाग सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.