लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महापालिकेकडे सुरू झाली आहे. महापालिका तीन दिवसांआड पाणी देण्यास नकारघंटा वाजवीत आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत महापालिका नागरिकांची तहान कशी भागविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जायकवाडीहून शहरात पाण्याच्या विविध टाक्यांवर मुख्य लाईनद्वारे पाणी आणण्यात येते. अनेक वसाहतींमध्ये मुख्य लाईनवरूनच पाण्याचे हजारो कनेक्शन घेण्यात आले आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत तर पाणीच पडत नाही. त्यामुळे सिडको एन-३ पासून थेट चिकलठाण्यापर्यंतच्या अनेक वॉर्डांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अगोदरच महापालिका अनेक वसाहतींना पाच दिवसांनंतर म्हणजेच सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करते. त्यातही कमी पाणी देण्यात येत नसल्याची नागरिकांची ओरड अधिक वाढली आहे. बुढीलेन लोटाकारंजापासून थेट आझाद चौकापर्यंतच्या अनेक वॉर्डांना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. मुकुंदवाडी, जयभवानीनगर येथील वसाहतींमध्येही सहाव्या दिवशीच पाणी येते. गुलमंडी, खाराकुंआ भागातही परिस्थिती वेगळी नाही. शहरातील मोजक्याच वॉर्डांमध्ये सहाव्या दिवशी पाणीपुरवठा का करण्यात येतोय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. समान पद्धतीने पाणी द्यावे या मागणीकडे एक वर्षांपासून प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. किराडपुरा, अल्तमश कॉलनी आदी गोरगरीब वसाहतींमध्ये नागरिकांकडे सहा दिवस पाणी साठविण्यासाठी जागाच नसते. त्यांना तीन दिवसांआड पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसने मनपासमोर मागील महिन्यात आंदोलनही केले. मात्र, आजपर्यंत प्रशासनाने निर्णय घेतला नाही. जुन्या शहरातील नगरसेवक तिसऱ्या दिवशी पाणी येत असल्याचा दावा करीत आहेत.दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढशहरातील ११५ वॉर्डांमधील किमान २५ पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.पाण्यात टाकायचे औैषध संपलेदूषित पाण्यामुळे साथरोग पसरू नयेत म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पाण्यात टाकणारे औषध देण्यात येते. मागील काही दिवसांपासून हे औषधही संपले आहे. पदमपुरा भागात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. या भागात मनपाने औषध वाटप केलेच नाही.
सहाव्या दिवशी पाणी; जनता व्याकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:05 AM