पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:38 PM2022-05-09T15:38:21+5:302022-05-09T15:43:32+5:30
मोमबत्ता, हर्सूल सावंगी तलावाच्या पाण्याचा वापरच नाही
औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक बनते. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षांमध्ये शहराची तहान भागविण्यासाठी कोणत्याही दीर्घकालीन उपाययोजनाच केलेल्या नाहीत. तहान लागली तर तात्पुरत्या उपाययोजनांवर दरवर्षी भर देण्यात येतो. शहरालगत असलेल्या दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव, हर्सूल सावंगी येथील पाझर तलावाच्या पाण्याचा पिण्यासाठी अजिबात वापर होत नाही. तलावातील पाण्याचे निव्वळ बाष्पीभवन होते, हे विशेष.
वाढत्या लोकसंख्येला समाधानकारक पाणी देणे, हे महापालिकेचे दायित्व आहे. १०२ टीएमसीचे धरण उशाला असल्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांचा कधीच विचार केला नाही. जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. सध्या मनपा सद्य:स्थितीत असलेल्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी तब्बल १४० कोटी रु. खर्च करीत आहे. तरीही ओरड कायम आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा खर्च मनपाला परवडणारा नाही. त्यामुळे आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे.
हर्सूल तलावाची स्थिती
हर्सूल तलावाच्या पाण्यावर १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान भागवली जात होती. या तलावाचे लाभक्षेत्र परिसरात मागील ७ दशकांमध्ये वाढच केली नाही. उलट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे दरवर्षी तलाव ओसंडून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाम नदीपात्रातून वाहून जाते. गाळ काढणे, लाभक्षेत्र वाढविले तर भविष्यात मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होऊ शकतो.
मोमबत्ता तलावाचे पाणी
दौलताबाद घाटात जि.प.च्या अखत्यारीत असलेल्या मोमबत्ता तलावातील गाळ, लाभक्षेत्र वाढवून त्यातील पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरता येऊ शकते. दौलताबाद समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर आहे. पडेगाव, भावसिंगपुरा, छावणी, रेल्वे स्टेशनपर्यंत या तलावाचे पाणी कोणत्याही पाण्याच्या मोटारी न लावता गुरुत्वाकर्षणाने देता येऊ शकते. याकडे शासन, प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.
हर्सूल सावंगी पाझर तलाव
हर्सूल गावापासून हाकेच्या अंतरावर हर्सूल-सावंगी पाझर तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा अजिबात वापर होत नाही. या तलावातही अनेक दशकांपासून गाळच गाठलेला नाही. ३० फूट पाणीक्षमता असलेल्या या तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून नारेगाव, चिकलठाणापर्यंत देता येऊ शकते.