आरोग्य धोक्यात : पालिकेने लक्ष देण्याची मागणीतुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला बोरी धरणातून दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, यामुळे शहरवासीयांसह देवी दर्शनानिमित्त येणार भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुळजापूर शहरासह तालुक्यातील नळदुर्ग व अणदूर या गावांना बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात सद्य$:स्थितीत केवळ १.१० दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंतही तो पुरेल की नाही, अशी शंका आहे. दुसरीकडे पाणीपातळी खालावल्यामुळे शहरासह परिसरातील बहुतांश बोअर बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसह बाहेरगावाहून देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचाच आधार आहे. परंतु, विकास प्राधीकरणाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले असले तरी शहराला पिवळसर रंगाचे पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) नागरिकांत संताप : जलशुद्धीकरण केंद्रावर लाखोंचा खर्चपाणी विक्री जोरातशहरात दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने अनेक नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत सुरु आहे. या विक्रेत्यांकडूनही अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पालिकेनेच शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. लवकरच दुरुस्ती : मगरयासंदर्भात नगराध्यक्षा अॅड. मंजूषा मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, चैत्रपौर्णिमा यात्रेपूर्वीच पूर्ण फिल्टर स्वच्छ करण्यात आले होते. शहरात जीवन प्राधिकरणाच्या नवीन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून, या पाईपलाईनचे हॅण्डवर्क झालेले नाही. कुठेतरी जलवाहिनी लिकेज असल्यामुळे दूषित पाणी येत आहे. याची लवकरच पाहणी करून लिकेज दुरूस्त केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
तुळजापूर शहराला दूषित पाणीपुरवठा !
By admin | Published: May 03, 2016 12:12 AM