औरंगाबाद : शहरातील नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि ७ दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठाकरायचा, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यासारखे आहे. समन्यायी पाणी वाटप व्हावे या हेतूने मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी महापालिका प्रशासनाला सूचना करणारा एक प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावानुसार प्रशासनाने बदल केले, तर नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल.
सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू आहे. आंदोलने, ठिय्या देणे, अभियंत्यांना मारहाण करणे, अशा घटना सध्या घडत आहेत; परंतु पालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात कोणतेही यश येत नाही. गुंठेवारी वसाहतींमधून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत आहे, अशा परिस्थितीत विकास मंडळ सदस्य नागरे यांनी मनपा आयुक्तांना प्रस्ताव देऊन काही उपाय सुचविले आहेत.
शहरातील एकूण किती ईएसआरमधून नागरिकांना पाणीवाटप होते त्यांची संख्या पाहा. प्रत्येक ईएसआरखाली किती लोकसंख्या येते याची माहिती घ्या. प्रत्येक ईएसआरमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीसाठा करण्याची तरतूद करा. जसे की, ३ लाख लोकसंख्या असलेल्या ईएसआरमध्ये ३० एमएलडी पाणीसाठा करावा. शहरातील ८ लाख लोकसंख्या (५० टक्के) असलेल्या ईएसआरमध्ये पहिल्या दिवशी ८० एमएलडी पाणी साठवून ते नागरिकांना १ दिवसात पुरविले जावे. शहरात पैठण धरणावरून मिळणाऱ्या १२० एमएलडी पाण्यापैकी ८० एमएलडी पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरणे शक्य आहे. उरलेले ४० एमएलडी पाणी हॉटेल, उद्योग, कारखाने व अग्निशमन आणि इतर उपयोगासाठी ठेवता येईल. या पद्धतीने २ दिवसांत पूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरविणे शक्य होऊ शकेल. तसेच व्यावसायिक आणि इतर वापरासाठी देखील याच रोटेशनने पाणी देता येईल. २ दिवसांत २४० एमएलडी पाणी पालिका जायकवाडीतून शहरात आणते. त्यामुळे त्याचे वितरण साठवण करून केले जावे, अशा पद्धतीने पाणी वाटप केले गेल्यास शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. कारण १६ लाख शहराची लोकसंख्या असून, त्या लोकसंख्येला २४० एमएलडी पाणी सहज पुरविणे शक्य होईल.
जनतेला वेठीस धरू नकानियोजनात पालिका कमी पडते आहे, असे सध्या तरी चित्र आहे. पाणी वाटप करण्यात अडचणी येत असल्यास चर्चा करून यावर मार्ग काढता येईल; परंतु पिण्याच्या पाण्यासाठी ७ दिवसांपर्यंत जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. वर्षभराची पाणीपट्टी घ्यायची आणि पाणी असताना फक्त ४८ दिवस पाणीपुरवठा करायचा, हे धोरण चुकीचे असल्याचे नागरे यांनी म्हटले आहे.