वाळूज महानगर: सिडको वाळूज महानगर २ मध्ये सध्या पाण्याची बोंबाबोंब सुरु आहे. सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे हाल सुरु आहेत. संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सिडकोच्या अधिकाºयाला बोलावून घेत पाणी प्रश्नावरुन चांगलेच धारेवर धरले व पाणी देण्याची मागणी केली.
सिडको प्रशासनाने वाळूज महानगर २ ला अगोदर चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, काही दिवसांपासून सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यामुळे हाल होत असल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सकाळी थेट सिडकोचे अधिकारी दीपक हिवाळे यांना बोलावून घेतले. यावेळी नागरिकांनी हिवाळे यांच्यावर पाणी प्रश्नावरुन धारेवर धरले. त्यावर हिवाळे यांनी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, टँकरच्या पाण्यावरुन वाद होत असल्याने टँकरने पाणी घेण्यास नागरिकांनी नकार दिला. दरम्यान, या चर्चेत कुठलाही तोडगा न निघाल्याने नागरिकांनी सिडकोचे अधीक्षक अभियंता विसाळे यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. विसाळे यांची शनिवारी भेट घेवून येथील नागरिक पाणी प्रश्न मांडणार आहेत. यावेळी नारायण होतोळे, प्रकाश वाघ, वंदना शेळके, कांचन सांबरे, गीता सोनवणे, मीना वाघचौरे, कामिनी वाणी, स्वाती रिठे, विजया कोळी, इंदूमती थोरात, मिनाक्षी झोपे, सरिता पाटील, अर्चना गोयकर, अनिता चव्हाण, निलिमा जंगले, रजनी तांदुळजे, संध्या निंबाळकर, मनिषा वेदपाठक, हेमा आग्रवाल, सुरेखा हातोळे, अनिता वाघ, पूनम सोनटक्के आदींसह ७० ते ८० महिला-पुरुषांची उपस्थिती होती.
यावेळी सिडकोचे उप अभियंता दीपक हिवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत असल्याने सहा-सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. या भागाला टँकरने पाणी देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र नागरिकांकडून टँकरऐवजी नळाने पाणी द्या, अशी मागणी केली जात आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाईल.