औरंगाबादच्या ग्रामीण भागातूनही शस्त्रसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:36 PM2018-06-01T16:36:44+5:302018-06-01T16:37:53+5:30
बिडकीन पोलिसांनी चार ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात ५ तलवारी, एक कुकरी, ६ चाकू व शस्त्र तयार करण्याचे साहित्य जप्त केले.
औरंगाबाद : बिडकीन पोलिसांनी चार ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात ५ तलवारी, एक कुकरी, ६ चाकू व शस्त्र तयार करण्याचे साहित्य जप्त केले. यासोबतच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई चितेगाव, केसापुरी, फारोळा व अलाना तांडा या गावात गुरुवारी रात्री व आज सकाळी करण्यात आली.
मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी ऑनलाईन खरेदीद्वारे मागविण्यात आलेला मोठा शस्त्रसाठा कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतला होता. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनीसुद्धा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांना खब-या कडून चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावात काही लोक बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगून आहेत अशी माहिती मिळाली.
यानुसार त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्रीपासून या गावात धाडसत्र सुरु केले. यात पाच जणांकडून ५ तलवारी, १ कोकरी, ६ चाकू जप्त करण्यात आले. यासोबतच त्यांच्याकडून हे शस्त्र तयार करण्याचे साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी दत्ता महादू बोचकरी (२८) रा.चितेगाव ता.पैठण, सतिश श्रीमंत सरोदे (२३) रा. केसापुरी ता.पैठण, बबन लिंबाजी कुलाल (२३) रा. फारोळा ता.पैठण, संतोषसिंग करमसिंग टाक (४५) रा. अलाना तांडा ता.जि. औरंगाबाद यांना ताब्यात घेतले. आरोपींनी कोणासोबत शस्त्राचा व्यवहार केला आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.