नकली सोन्याचा हार घेऊन बँकेत लाखांचे कर्ज मागायला गेले अन् अडकले
By सुमित डोळे | Published: April 11, 2024 12:19 PM2024-04-11T12:19:28+5:302024-04-11T12:20:08+5:30
उधारी फेडण्याची शक्कल अंगलट; एसबीआय बँकेत दोन तरुण रंगेहाथ पकडले गेले
छत्रपती संभाजीनगर : रविवारच्या बाजारातून दीड हजार रुपयांत खोट्या सोन्याचा हार विकत घेऊन दोन तरुणांनी एसबीआय बँक गाठली. तेथे जाऊन सोने गहाण ठेवून कर्जाची मागणी केली. मात्र, क्षणात त्यांचा भांडाफोड होऊन त्यांची रवानगी थेट पोलिस ठाण्यात झाली. सादिक शामक शेख (वय २८, रा. जळगाव फेरण) व उद्धव गंगाधर साळुंके (३२, रा. गोलटगाव) असे संशयितांची नावे असून, जवाहरनगर पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
एसबीआय बँकेच्या शिवाजीनगरच्या शाखेमध्ये उद्धव व सादिक दुपारी दोन वाजता गेले होते. कर्जाची गरज असल्याचे सांगून गोल्ड लोनसाठी सोने गहाण ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यासाठी हुबेहूब सोन्याचा वाटावा असा एक हारदेखील बँक कर्मचाऱ्यांच्या हाती टेकविला. मात्र, कर्मचाऱ्यांना तेथेच संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. निरीक्षक सूरज बंडगर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक अर्जुन राऊत, अंमलदार मारोती गोरे, विष्णू काळे यांनी बँकेत धाव घेतली. तोपर्यंत सादिक पळण्याच्या तयारीत होता. गोरे यांनी मात्र त्याला पकडून ठेवले. त्याचा मित्र उद्धव सूतगिरणी चौकात दुचाकीसह उभा होता. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेत त्यालाही ताब्यात घेत दोघांना ठाण्यात नेले.
उधारी फेडण्यासाठी केला प्रयत्न
उद्धव व सादिक दोघेही सुशिक्षित असून, दोघांचे बाहेर मोठ्या प्रमाणात व्यवहारातून उधारी झाली आहे. ती फेडण्यासाठी दोघेही झटपट पैशांचा मार्ग शोधत होते. यापूर्वी त्यांनी बदनापूरच्या एका बँकेत असाच प्रयत्न केला. मात्र, तेथून त्यांना हाकलून देण्यात आले. बँकेने यात तक्रार देण्यास नकार दिल्याने अंमलदार मारोती गोरे यांच्या फिर्यादीवरून यात गुन्हा दाखल करण्यात आला.