औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ८३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळ्याचे ४५ दिवस शिल्लक असून, या काळात सरासरीच्या १७ टक्क्यांपेक्षा जास्तीचा पाऊस झाला तर विभागाला यंदाही ओल्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये सुमारे ८७ टक्के जलसाठा आहे. यांतील सात प्रकल्प तुडुंब होण्यासारखी परिस्थिती आहे.ऑगस्ट महिन्यात आजवर विभागात ५० मि.मी. पाऊस झाला आहे. १६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत ५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मि.मी. आहे.
४५० पैकी २०७ मंडळांत आजवर अतिवृष्टी झाली आहे. ५२ नागरिकांना पावसाळ्यातील विविध घटनांमध्ये जीव गमवावा लागला; तर लहान-मोठी मिळून ७४६ जनावरे मृत झाली. ८ हजार १२२ मालमत्तांची पडझड झाली असून यांतील ४४२ मालमत्ता मदतीस पात्र ठरविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक ७ हजार १३३ मालमत्ता नांदेड जिल्ह्यातील आहेत.
४ लाख ४८ हजार हेक्टरचे नुकसान४ लाख ४८ हजार ७५४ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. ७ लाख ४ हजार ९९५ शेतकऱ्यांचे हे नुकसान असून त्यांना अद्याप कुठलीही शासकीय मदत जाहीर नाही. ३० गावांमधील १५४२ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. शासनाने केलेल्या घोषणेनुसार ७५० कोटी रुपयांची मदत भरपाईसाठी लागणार आहे. जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दुप्पट नुकसानभरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी १० ऑगस्टला जाहीर केले. त्यांच्या घोषणेनुसार मराठवाड्यात भरपाईसाठी अंदाजे ७५० कोटी रुपये लागतील. गेल्या आठवड्यात पाऊस, पिकांचे नुकसान वाढले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १ लाखाने वाढली आहे.
११ प्रकल्पांत ८७ टक्के जलसाठाविभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये ८७ टक्के जलसाठा आहे. यात जायकवाडीमध्ये ९५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ६९, येलदरी ८७, सिद्धेश्वर ९७, माजलगाव ५४, मांजरा ३९, पैनगंगा ९३, मानार ९९ टक्के; तर निम्न तेरणा ९०, विष्णुपुरी ७४ टक्के जलसाठा आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात ३० टक्के जलसाठा आहे.