मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकामगारांना अर्थसाहाय्य करण्यात आल्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते.
औरंगाबाद जिल्ह्यात कामगार उपायुक्त कार्यालयात आजघडीला १ लाख ५००५ बांधकाम कामगारांची नोंद आहे. त्यात यंदा नूतनीकरण केलेले सक्रिय बांधकाम कामगारांची संख्या १५७७३ एवढी संख्या आहे. कामगार उपायुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसाहाय्य मिळण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. आम्ही बांधकाम कामगारांची यादी मुंबईला पाठवली आहे. मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयातून थेट रक्कम बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा होतील. रक्कम जेव्हा संपूर्ण बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा होते. त्यानंतर आयुक्तालयातून यादी औरंगाबादला प्राप्त होते. यामुळे अजून किती जणांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही हे सध्या सांगता येत नाही, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, आजघडीला नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांपैकी बहुतांश कामगारांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे. बांधकाम कामगारांना लवकरात लवकर अर्थसाहाय्य मिळावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले.
चौकट
नोंदणी केलेले बांधकाम मजूर- १०५००५
नोंदणी न केलेले बांधकाम मजूर - १०००००
----
मागील वर्षी मिळाले, यंदा नाही
मागील वर्षी माझ्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा झाले होते. मात्र, मागील महिन्यात सरकारने जी घोषणा केली त्यानुसार दीड हजार रुपये प्राप्त झाले नाहीत.
-दत्ता सोनवणे, बांधकाम कामगार
---
दीड हजार जमा झालेच नाहीत
मागील वर्षी माझ्या बँक खात्यात एकदा २ हजार, नंतर ३ हजार रुपये जमा झाले होते. आता दीड हजार रुपये जमा होण्याची वाट पाहत आहे.
-हौसाबाई जोगदंड, बांधकाम कामगार
---
कालच बँकेत जाऊन आलो
मी फर्निचर तयार करण्याचे काम करतो. मात्र, कोरोनामुळे अनेकांनी काम पुढे ढकलले आहे. दीड महिन्यापासून हाताला काम नाही. बुधवारीच पास बुक अपडेट केले. रक्कम जमा झाली नाही.
-राजेश पाल, फर्निचर कारागीर
---