औरंगाबाद : देशाच्या फाळणीदरम्यान पाकिस्तानात निघून गेलेल्या हत्तेसिंगपुरा (कटकट गेट) परिसरातील नागरिकाची ५ एकर २५ गुंठे जागा केंद्र शासनाच्या नावावर करण्यात आली आहे. याबाबतचे पीआर कार्ड तयार करण्यात आले असून, त्यावर केंद्र शासनाचे नाव लावण्यात आले आहे. सातबाऱ्यावर महसूल प्रशासन नोंद घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतातील मालमत्ता सोडून जे नागरिक पाकिस्तान किंवा इतर देशांत निघून गेले, त्यांची मालमत्ता एनिमी प्रॉपर्टी (शत्रू संपत्ती) म्हणून गृहीत धरण्यात येते. शहरातील हत्तेसिंगपुरा, चेलीपुरा भागांतील सहा ठिकाणच्या मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आल्या. यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल व वन विभाग) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील शत्रू संपत्तीचे सर्वेक्षण, सीमांकन, मूल्यांकन करून सर्व अधिकार व अभिलेखात कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फाॅर इंडिया यांच्या नावे नोंद घ्यावी. तसेच त्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात यावा, असे सांगितले.
येथील आहे मालमत्ताशहरातील हत्तेसिंगपुरा व चेलीपुरा येथील मिळकत सीटीएस नं. ११६०२/१ मधील ६ हजार ८६१ चौ.मी. सीटीएस ११६०२/३, ४, ५ मधील १३५ चौ.मी. व सीटीएस ११६०२/७९ मधील १५९० चौ.मी. क्षेत्रफळ शत्रू संपत्ती म्हणून जाहीर झाले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाला ही जागा ताब्यात घेण्यासाठी आदेशित करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासनाचे पत्र असेनिवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी नगर भूमापन अधिकाऱ्यांना पत्र दिले. डिसेंबर २०२१ च्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पत्रानुसार कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कायदेशीर कारवाईच्या अनुषंगाने संबंधितांना पत्र दिले आहे.
नगरभूमापन विभागाचे म्हणणेनगर भूमापन विभागाने सांगितले की, २००९ मध्ये एका प्रकरणात पीआर कार्डवर कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फाॅर इंडियाची नोंद झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार भूमापन कार्यालयाने पीआर कार्डवर नोंद घेतली असून, सव्वापाच एकर जागेवर जे अतिक्रमण असेल, त्याबाबत जिल्हा प्रशासन निर्णय घेईल.