समांतर योजनेच्या पॅकअपनंतर शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 07:54 PM2019-02-21T19:54:36+5:302019-02-21T19:59:22+5:30
शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.
औरंगाबाद : शहराला २५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी हवे असताना जेमतेम १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे, अशा बिकट स्थितीत शहरात ९ वर्षांपासून चर्चेत असलेली समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मात्र, आगामी निवडणुकीमुळे किमान सहा महिने तरी राज्य शासनाला नवीन योजना जाहीर करायला वेळ नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय होणार, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.
औरंगाबाद शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता महापालिके कडून होणारा पाणीपुरवठा आजघडीला अपुरा पडत आहे. शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी समांतर योजनेकडे नागरिकांचे डोळे लागले होते. त्यादृष्टीने समांतर योजनेची मार्च २०११ मध्ये निविदा मंजूर झाली होती. मात्र, अनेक गोंधळ, वादात एक-एक वर्ष उलटून गेली. गेल्या ९ वर्षांत पाणी तर मिळालेच नाही. शासनाकडे नव्याने योजना मागण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने समांतरच्या कंपनीसोबत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहे. समांतरच्या कंपनीनेदेखील अटी मान्य होणार नसतील, तर आम्ही काम करणार नाही, असे लेखी कळविले. त्यानंतर मनपाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील समांतर योजनेला गुंडाळण्यावर १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले. समांतर जलवाहिनीसाठी कें द्र्र शासनाने २०११ मध्ये १४२ कोटी रुपये दिले आहेत. राज्य शासनाने १८ कोटी रुपये दिले आहेत. यावर सुमारे १४० कोटी रुपयांचे व्याज जमा होत आले आहे.
मनपाकडून शासनाकडे नव्या योजनेसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे; परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच आचारसंहिताही लागणार आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत तरी प्रस्तावाला मंजुरी मिळणे अशक्य दिसते. निवडणुकीच्या व्यापात राज्य शासनाला शहरासाठी नवीन योजना जाहीर करण्यासाठी फुरसत नाही. प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळाली तरी प्रत्यक्ष काम होऊन शहरात वाढीव पाणी येण्यासाठी किती वर्षे लागतील, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना किमान तीन वर्षे तरी सध्या मिळणाऱ्या पाण्यातच भागवावे लागणार असल्याचे दिसते.
उन्हाळ्यात पाण्यासाठी चटके
इतक्या वर्षात समांतर योजना पूर्ण करून शहरात मुबलक पाणी देणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे औरंगाबादकरांना उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके बसू लागतात. यंदाही हीच परिस्थिती राहणार आहे. कारण शहरातील पाणीपुरवठा आताच विस्कळीत झालेला आहे. काही वॉर्डांमध्ये चार दिवसाआड तर काही वॉर्डांत पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एन-५, एन-७ येथील पाण्याच्या टाक्या उशिरा भरल्या जातात. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे आणखी हाल होणार आहेत. समांतर योजना पूर्ण होऊ शकली नाही, हेच यासाठी कारणीभूत ठरले आहे.
दररोज पाणी स्वप्नवत
गेल्या अनेक वर्षांपासून समांतर योजनेच्या नावाखाली शहरवासीयांना दररोज पाणी देण्याची स्वप्नेच दाखविण्यात आली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही मुबलक पाणीपुरवठ्याचा मुद्दा वापरण्यात आला. प्रत्यक्षात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहराजवळ जायकवाडी धरण असूनही शहरापर्यंत पाणी पोहोचविण्याची नवीन व्यवस्था महापालिका उभी करू शकत नाही.
............