सिल्लोड (औरंगाबाद ) : आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नौकरी लावून देते असे सांगून ५ लाखाची मागणी करून यातील २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोरगाव सारवानी येथील आरोग्य सेवीकेस लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले. आरोग्य सेवीकेचे नाव सुनिता किसन चंडोल ( ३९ ) असे असून ही कारवाई पंचायत समिती आवारात करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुनिता चंडोल या आरोग्य विभागात सेविका या पदावर कार्यरत आहे . त्यांनी आरोग्य विभागात सेवक पदी नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन तक्रारदारास ५ लाखाची मागणी केली. यातील ४ लाख ७० हजार रूपये आरोपीने यापुर्वीच घेतले आहेत. आज यातील राहिलेल्या रक्कमेतील २५ हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली.
यावरून आज दुपारी पंचायत समिती परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापाळा रचला. यावेळी २५ हजाराची लाच घेताना पथकाने आरोपी चंडोलस रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोह गणेश पंडुरे, विजय बाम्हंदे, पोना रवींद्र अंबेकर, पोशि सुनिल पाटील यांनी केली.