शिवाजीनगर भुयारी मार्गाचा‘संग्राम’ केव्हा संपणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:03 AM2021-02-17T04:03:27+5:302021-02-17T04:03:27+5:30
औरंगाबाद : रेल्वे येताच फाटक बंद होते आणि रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागतात. रेल्वे काही मिनिटांत ...
औरंगाबाद : रेल्वे येताच फाटक बंद होते आणि रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागतात. रेल्वे काही मिनिटांत निघून जाते, पण वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना रोज ‘संग्राम’ करावा लागतो आहे. येथील प्रस्तावित भुयारी मार्ग अद्याप कागदावरही अवतरला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात भुयारी मार्ग कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
सातारा आणि देवळाईमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. या भागातील नागरिकांनी शिवाजीनगर रेल्वे गेट ( क्रमांक ५५) येथून जावे लागते. या गेटवर रेल्वे जाण्याच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा रोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गासाठी ३८.६० कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनासोबत भागीदारी तत्त्वावर मान्यता दिली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने निधीला मंजुरी दिली. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी, निविदाप्रक्रिया अशा कागदोपत्री प्रक्रियात हा मार्ग प्रत्यक्षात तयार होण्यासाठी आणखी किती कालावधी लागतो याचा अंदाजच नाही.
अनेक वर्षांपासून प्रतीक्षा
अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाची प्रतीक्षा केली जात आहे. या
मार्गासाठी मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग (जागतिक बँक प्रकल्प) आणि उपविभागीय अधिकाऱ्याकडून एनओसी मिळाली आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी बाकी आहे. ही एनओसी मिळाल्यानंतर महिनाभरात रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले पाहिजे. या मुदतीत काम सुरू झाले नाही, तर आंदोलन केले जाईल.
-बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती
...तर रेल्वे रोको
न्यायालयात याचिका दाखल करून शिवाजीनगर येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्य शासनाने आता निधीला मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनओसीनंतरही उशीर झाला तर रेल्वे रोको केला जाईल.
- ॲड. शिवराज कडू पाटील
लवकरच भुयारी मार्ग
भुयारी मार्गासाठी महाराष्ट्र शासनाच्या भागीदारी तत्त्वावरील हिश्याचे २२.०५ कोटी रुपयांच्या निधीला साेमवारी मंजुरी मिळाली आहे. रेल्वेकडून निविदाप्रक्रिया राबवून काम केले जाईल. त्यामुळे लवकरच हा मार्ग होईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- खा. इम्तियाज जलील