स. सो. खंडाळकर
औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतर राज्य शासनाने रिक्षाचालकांना त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप तरी हे आश्वासन पूर्ण झाले नसून रिक्षाचालक या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑनलाइन पद्धतीने ही मदत मिळणार असल्याने ती वेगाने होण्याऐवजी त्यातल्या दिरंगाईमुळे रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.
................
आणखी पंधरा ते वीस दिवस लागतील....
एनआयसी सॉफ्टवेअर सिस्टमने हे पैसे उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवस लागतील. डाटा भरल्यानंतर रिक्षाचालकांच्या थेट खात्यात दीड हजार रुपये जमा होतील.
संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
....................
परवानाधारकांची संख्या: औरंगाबाद जिल्ह्यात २६०००
परवाना नसलेले रिक्षाचालक : १०,००० ते १५,०००
.........................
दीड हजारांत काय होईल?
दीड हजारांत काय? होणार आहे. आता ५००० रुपये आणि नंतर दरमहा अडीच हजार रुपये रिक्षाचालकांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजेत. भूक आत्ता लागलेली आहे आणि सरकार कधीतरी आणि अर्धवट जेवू घालत आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यातही या योजनेचा लाभ १५ ते २० टक्के रिक्षाचालकांना मिळणार आहे. उर्वरित रिक्षाचालक या लाभापासून वंचित राहणार आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून नूतनीकरणही थांबलेले आहे. मग त्यांचे काय?
- कॉ. बुध्दीनाथ फराळ, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा लाल बावटा रिक्षाचालक कामगार युनियन.
.....................
स्मरणपत्र दिले...
परमिटधारक रिक्षाचालकांसहित लायसन्स, बॅच असलेल्या रिक्षाचालकांना दरमहा १० हजार रुपये अर्थसहाय्य तातडीने द्या, अशी आमची मागणी आहे. दिवस-दिवस वाट पाहूनही रिक्षाचालकांचे पेट्रोलचे पैसेही निघत नाहीत, अशी अवस्था आहे. उधार-पाधार करून किंवा उपासमारीने आजपर्यंत दिवस काढलेत. माणसाला २ वेळेस भूक लागते आणि भूक काही सरकारी निर्णय, प्रक्रिया यासाठी थांबत नसते. त्यामुळे तत्काळ युद्धपातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले पाहिजेत.
-कॉ.अभय टाकसाळ,
सरचिटणीस,लालबावटा रिक्षाचालक युनियन, आयटक संलग्न.
................
पेट्रोलचा खर्चही निघत नाही
रिक्षात बसणाऱ्या मध्यमवर्गीय व निम्नमध्यमवर्गीय लोकांची आमदनीच या काळात कमी झाल्याने लोक रिक्षात बसण्याचेही टाळत आहेत. परिणामी दिवसभर रिक्षास्टॅण्डवर प्रवाशांची वाट पाहत बसूनही पेट्रोलचा खर्चही निघत नाही.
राजू हिवराळे, रिक्षाचालक
............................
दंड तरी लावू नका
रिक्षाचा बँक हप्ता, विमा नूतनीकरण, परमिट नूतनीकरण आदी रक्कम ही खिशातूनच भरावी लागत आहे. यातच पोलीस वेगवेगळ्या कारणांमुळे दंड लावत असल्यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीला आलेला आहे. जाहीर केलेल्या १५०० रु. ची रक्कम वाढवून किमान ५ हजार रुपये करावी, रिक्षाचालकांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरण केलेल्या व मास्क लावलेल्या तीन प्रवाशांना रिक्षात प्रवास करण्याची परवानगी द्यावी,असे आम्हाला वाटते.
संदीप सुराशे,रिक्षाचालक
....................