छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाली आहे. धक्का लागला तरी ही जलवाहिनी फुटते. या जलवाहिनीच्या बाजूला नवीन ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी ११:३० वाजता श्रीहरी असोसिएट्स या कंपनीचे कर्मचारी गेवराई तांडा येथे जेसीबीने काम करीत असताना जीर्ण जुन्या जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाणी वाया गेले. युद्धपातळीवर पाणीपुरवठा थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जुन्या शहराला बुधवार, गुरुवारी निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
२,७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या व्यतिरिक्त १९३ कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत टाकण्यात येत असून, मागील एक महिन्यापासून युद्धपातळीवर काम सुरू आहे. बुधवारी सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून जुनी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. कंत्राटदाराच्या कामगारांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले; परंतु, त्यांना ते जमले नाही. मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.बी. काझी, उपअभियंता किरण धांडे, एम.एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, सुहास लेहाडे यांच्यासह नूर कन्स्ट्रक्शन कंपनीचे कामगार तातडीने गेवराई येथे पोहोचले. त्वरित दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम चालणार आहे.
जुन्या शहरात निर्जळीजलवाहिनी फुटल्यामुळे जुन्या शहरात बुधवारी अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा झाला नाही. गुरुवारीही अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. बुधवारी ज्यांना पाणी मिळाले नाही, त्यांना गुरुवारी पाणी दिले जाणार आहे.