औरंगाबाद : भूखंडाची सातबारावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून ३ हजार रुपये लाच घेताना देवळाई सजाचा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला. ही कारवाई बुधवारी दुपारी देवळाई येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.भरत दगडू दुतोंडे असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचारी सतत लाचेच्या जाळ्यात अडकत आहे. दोन दिवसांपूर्वी अप्पर तहसीलदार वाळू ठेकेदाराकडून दीड लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई ताजी असताना देवळाई तलाठी सजाचा तलाठी दुतोंडे हा लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली. तक्रारदार यांनी देवळाई परिसरात भूखंड खरेदी केला. या भूखंडाची नोंद करून सातबारा मिळावा याकरिता त्यांनी आरोपी दुतोंडे याची भेट घेतली होती, तेव्हा हे काम करण्यासाठी दुतोंडे याने तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपये लाच मागितली.
तक्रारीच्या अनुषंगाने दोन साक्षीदार पाठवून पोलिसांनी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली. यावेळी आरोपी दुतोंडे याने तक्रारदार यांच्याकडे तडजोड करीत तीन हजार रुपयांची मागणी केली. पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, हवालदार अरुण उगले, दीपक पाठक, केवलसिंग घुसिंगे आणि चालक चांगदेव बागूल यांनी देवळाई येथील तलाठी सजा कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपये लाच घेताच पोलिसांनी दुतोंडेला रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपी दुतोंडेविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.