छत्रपती संभाजीनगर : धाबा, बारवर काम करतानाच बनावट विदेशी दारू तयार करू लागला. त्यासाठी गोव्यातील विदेशी मद्याचा कच्चा माल म्हणून वापर करीत होता. गोव्यातील दारू शहरातील बारमध्ये रिकाम्या झालेल्या महागड्या ब्रॅण्डच्या बॉटलमध्ये टाकून त्यावर नवीन लेबल लावून विक्री करण्यात येत होती. याविषयीची माहिती समजताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १२ लाख ४७ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी दिली.
दादासाहेब पांडुरंग मुटकुळे (मुळ रा. मांडवा, ता. आष्टी, जि.बीड, ह.मु. साई रेजेन्सी, सिडको वाळूज महानगर) आणि दिनेश सखाराम धायडे (रा. घाणेगाव, ता. गंगापुर) अशी आरोपींची नावे आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांना दोन जण बनावट विदेशी मद्याची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भेंडाळा फाटा शिवारात सापळा लावत स्कोडा कंपनीच्या रॅपीड गाडीतुन (एमएच ४६, डब्ल्यू ९३२९) येणाऱ्या दोन आरोपींना पकडले. ही गाडी थांबविल्यानंतर त्यात बनावट इंम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांनी भरलेले १२ खोके आढळले. त्यात ५७६ सिलबंद बाटल्या होत्या. या
बाटल्यांवर वेगवेगळ्या क्रमांकाचे बॅच असल्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय वाढला. त्यांनी दोघांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी दादासाहेब मुटकुळे याच्या भाड्याच्या घरातच बनावट दारू तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याठिकाणी पथकाने छापा मारल्यानंतर गोव्यातील वेगवेगळ्या प्रकारची विदेशी मद्याचा साठा आढळला. दोघांकडून पथकाने एकुण १२ लाख ४७ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधिक्षक शरद फटांगडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक एस.के. वाघमारे, एस.एस. गुंजाळे, जवान आर.एल. बनकर, व्ही.एस.पवार, वाय.पी. घुनावत, एम.एच. बहुरे आणि व्ही.जी.चव्हाण यांच्या पथकाने केली.असा तयार करायचा बनावट दारू
आरोपी मुटकुळे हा गोव्यातील हालक्या प्रतिची विदेशी मद्य आणून त्यातील दारू महागड्या ब्रँडच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरीत होता. त्यामध्ये तो कोणकोणते रसायन मिळसत होता, त्याविषयीची माहिती प्रयोगशाळेत दारूच्या तपासणीनंतर समोर येणार आहे.