कोणाच्या आदेशाने टेस्ट केली, रुग्णालयातून निघून जा;कोरोनाबाधित अधिपरिचरिकेला सिव्हिल सर्जनने सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:36 PM2021-03-15T23:36:05+5:302021-03-16T00:08:50+5:30
आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारीनंतर असे काही बाेललोच नाही असे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले
औरंगाबाद : 'कोणाच्या आदेशाने अँटीजन टेस्ट केली, ज्याने टेस्ट केली त्याला निलंबित करतो, मला विचारल्याशिवाय रुग्णालयात काहीही होत नाही. आत्ताच रुग्णालयातून बाहेर निघा' असे कोरोनाबाधित अधिपरिचरिकेला जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाल्याची तक्रार अधिपरिचरिकेच्या पतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
जनाबाई मुंढे असे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अधिपरिचारिकेचे नाव आहे. सर्दी आणि ताप आल्याचे जाणवल्याने त्यांनी १२ मार्च रोजी रात्रपाळीत कर्तव्यावर असताना अँटीजन टेस्ट करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे लगेच तेथेच त्या उपचारासाठी अॅडमीट झाल्या. दुसर्या दिवशी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांना सुरक्षेच्या मुद्यावरून त्यांनी फोन केला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी डॉ. मुदखेडकर यांच्या फोनवरून जनाबाई मुंढे यांच्याशी संवाद साधला. कोणाच्या आदेशाने तुम्ही अॅन्टिजेन टेस्ट केली, ज्याने तुमची टेस्ट केली त्याला मी निलंबित करतो. मला विचारल्याशिवाय या रूग्णालयात काहीही होत नाही. तूम्ही कशा काय अॅडमीट झाल्या. रिपोर्ट मला कसा दिसला नाही. आताच रूग्णालयामधून बाहेर निघा, असे जिल्हा शल्यचिकित्सक म्हटल्याचे जनाबाई यांचे पती सचिन सोनी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी चौकशी करून डॉ. कुलकर्णी यांना निलंबित करावे, अशी मागणीही सचिन सोनी यांनी केली आहे.
जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु
सदर अधिपरिचारिका यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपचार सुरु आहे. त्यांना निघू जा, असे म्हणण्याचा प्रश्नच नाही. रुग्णालयात अँटीजन टेस्ट होत नाही. शिवाय अँटीजन टेस्ट होत नसल्याचे नागरिकांना सांगितले जाते, केवळ आरटीपीसीआर तपासणी केली जाते. त्यामुळे अँटीजन टेस्टविषयी विचारणा केली होती.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक