विद्यापीठाचा प्रकुलगुरू कोण होणार?; आज व्यवस्थापन परिषदेची बैठक
By राम शिनगारे | Published: February 9, 2024 02:04 PM2024-02-09T14:04:42+5:302024-02-09T14:05:45+5:30
प्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक तब्बल तीन महिन्यांनी होत आहे. या बैठकीत विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदाच्या नावाला मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. एकूण विषयपत्रिकेवर ७० विषय असून, ६६ व्या क्रमांकावर प्रकुलगुरूंच्या नावाला मंजुरीचा विषय ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरू आणि चार अधिष्ठातांची नियुक्ती केली होती. त्यात ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वाल्मिक सरवदे यांना प्रकुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. मात्र, ४८ तास होण्यापूर्वीच त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यासाठी कुलगुरूंकडून तांत्रिक कारण देण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच काही संघटनांनी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांची पुनर्नियुक्ती करण्याची मागणीही केली होती. त्याविषयी ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रकुलगुरूपदासाठी डॉ. वाल्मिक सरवदे हे सर्वांत प्रबळ दावेदार आहेत. त्याशिवाय रसायनशास्त्राचे माजी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्या नावाला सत्ताधाऱ्यातील एका गटाचा पाठिंबा आहे तसेच पर्यावरणशास्त्राचे डॉ. सतीश पाटील, माजलगावच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे, प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांच्यापैकी कोणाच्याही नावाचा ऐनवेळी विचार केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
पुण्याहून नाव येणार असल्याची चर्चा
प्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षाच्या संबंधित विद्यापीठ विकास मंचच्या व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद आणि अधिसभा सदस्यांनी बुधवारी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत प्रकुलगुरूंच्या नावावर चर्चा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुरुवारी रात्रीपर्यंत मंचच्या संबंधित अनेक सदस्य नावाविषयी अनभिज्ञ होते. पुण्याहून शुक्रवारी सकाळी नाव येईल, त्यानुसारच निर्णय होईल, असेही एका सदस्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.