छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. मात्र, मागील निवडणुकीत भरघोस मते घेतलेल्या उमेदवारांना डावलून यावेळी त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाऊसाहेब आंधळकर (उस्मानाबाद), नरसिंग उदगीरकर (लातूर), अविनाश भोसीकर (नांदेड), बी. डी. चव्हाण (हिंगोली), पंजाबराव डख (परभणी), प्रभाकर बकले (जालना), अशोक हिंगे (बीड) आणि अफसर खान (औरंगाबाद) असे वंचितचे उमेदवार आहेत.
वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. वंचित आणि मविआ एकत्र आले असते, तर दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतांची फाटाफूट टळून महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलले असते, असे अनेकांना वाटते. मागील लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, वंचितमुळे आपले नुकसान होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील होते. वंचितला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगत होते. मात्र, मविआकडून दोनच जागांचा प्रस्ताव आल्याचे वंचितच्या नेत्यांचे म्हणणे होते. जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये नेमके काय झाले, याचा दोन्हींकडून परस्परविरोधी तपशील समोर आला. मविआचे नेते आम्हाला टाळत होते, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला, तर आंबेडकरांना आमच्यासोबत यायचेच नव्हते. ते केवळ टाईमपास करत होते, असा आरोप पटोले आदींनी केला.
वंचितच्या या एकला चलो रे भूमिकेविषयी ‘निर्भय बनो’ अशी मोहीम चालविणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील टीका केली. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी तर ‘वंचितला मत देऊ नका’ असे थेट आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. वंचितवर अशा प्रकारचा आरोप करणारे तुषार गांधी एकटे नाहीत. पुरोगामी चळवळीतील इतरही काहीजणांनी अशीच भूमिका मांडली. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही ‘पॉलिटिकल फ्रन्ट’ची वैचारिक भूमिका एक आहे. देशाचे संविधान वाचविण्यासाठी, प्रतिगामी शक्तींचा पाडाव करण्यासाठी अशा समविचारी राजकीय शक्तींनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना या भूमिकेमागे आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून तो इतरांच्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या दावणीला का बांधावा, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांचा आहे. वंचितने कोणासोबत आघाडी करावी की स्वतंत्र लढावे, याचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत. इतरांनी त्यात उगीच लुडबूड करता कामा नये, असे ॲड. आंबेडकर यांचे म्हणणे आहे. मविआचे नेते भविष्यात भाजपात जाणार नाहीत, याची काय गॅरंटी, असा त्यांचा सवाल आहे.
वंचितचा बसला होता फटका२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद अशा पाच जागांवर वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला होता. नांदेडमध्ये वंचितचे यशपाल भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मते घेतल्यामुळे काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला. यावेळी भिंगे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले. लातूरमधून राम गिरकर यांनी १ लाख १२ हजार मते घेतली होती. त्यांनाही उमेदवारी डावलण्यात आली. तिथे वंचितने यावेळी नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी दिली आहे. परभणीत तर जाहीर केलेला उमेदवार बदलून पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली. मागच्या वेळी अलमगीर खान यांनी १ लाख ४९ हजार मते घेतली होती. हिंगोलीत मोहन राठोड या वंचितच्या उमेदवाराने सुमारे १ लाख ७४ हजार मते घेतल्याने तिथेही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. यावेळी वंचितने तिथे बी.डी. चव्हाण यांना संधी दिली आहे. मागील निवडणुकीत चांगली मते घेणारे उमेदवार डावलून यावेळी नवे चेहरे का देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर अद्यापतरी वंचितकडून स्पष्टीकरण आलेले नाही. शिवाय, अशोक हिंगे आणि प्रभाकर बकले सोडले तर वंचितने देखील उमेदवार आयात केले आहेत. गेली पाच वर्षे वंचितसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचाही आरोप होत आहे.
२०१९ : वंचितचे उमेदवार/ घेतलेली मतंलातूर : राम गिरकर -११२२५५जालना : शरदचंद्र वानखेडे - ७७१५८नांदेड : प्रा. यशपाल भिंगे - १६६१९६बीड : प्रा. विष्णू जाधव-९२१४९परभणी : अलमगीर खान- १४९९४६हिंगोली : मोहन राठोड - १७४०५१उस्मानाबाद : अर्जुन जाधव - ९८५७९