- श्यामकुमार पुरेसिल्लोड ( औरंगाबाद ) : मजुरी करणाऱ्या पत्नीने मांसाहारा ऐवजी जेवणात पिठले केले म्हणून दारुड्या पतीने तिला काठीने बेदम मारहाण केली. ऐवढ्यावर न थांबता रक्तबंबाळ अवस्थेतील पत्नीला त्याने फासावर लटकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद येथे शुक्रवारी रात्री घडली. गंभीर जखमी अवस्थेत विवाहितेने स्वतःची कशीबशी सुटका करून तेथून पळ काढत शेजारी आश्रय घेतल्याने जीव वाचला. विवाहितेवर सध्या सिल्लोड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री विवाहितेने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात पती नागेश गोपीनाथ शिंदे विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.
कौशल्याबाई नागेश शिंदे ( २५, रा.रहिमाबाद ) असे गंभीर जखमी विवाहितेचे नाव आहे. कौशल्याबाई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती नागेश मला नेहमी दारू पिऊन मारहाण करतो, मी मजुरी करते तो काही कमाई करत नाही. मात्र, माझ्यावर रुबाब करतो. शुक्रवारी रात्री नागेश दारू पिऊन आला आणि मला म्हणाला, जेवणात मटण का केलं नाही. मी त्यांना सांगितले की, माझ्याकडे पैसे नव्हते. तुम्ही मटण आणून द्या, मी करून देते. पैसे नाही तर मटण कसे आणू, असे म्हणताच पती नागेशने काठीने बेदम मारहाण केली.
रक्तबंबाळ अस्वस्थेत पडलेली असताना पती नागेशने मृत आहे कि जिवंत याची खात्री केली. जीव गेला नाही हे पाहताच मला फासावर लटकावण्याचा प्रयत्न केला. पण कसाबसा प्रतिकार करत मी घरातून पळाले व शेजारील नागेश चिंचपुरे यांच्या घरात आश्रय घेतला. यामुळे माझा जीव वाचला. पती दारुडा असून काही करत नाही. सतत मारहाण करतो यामुळे दोन्ही मुलांना शिक्षणासाठी माहेरी ठेवले असल्याचे जखमी विवाहिता कौशल्याबाई यांनी सांगितले.