छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण, सारथीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यार्थी वसतिगृह, अरबी समुद्रातील शिवस्मारक आदींचे प्रलंबित प्रश्नाकडे शासन दुलर्क्ष करीत आहे. राज्य सरकार जर मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देणार नसेल तर मराठवाड्याचा समावेश तेलंगण राज्यात करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्य समन्वय रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारणे, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय झाला, परंतु याची अंमलबजावणी नाही. मराठा आरक्षणाचे भविष्य काय आहे, याचे उत्तर राज्यसरकारकडे नाही.मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या राजकीय समन्वयकांना हाताशी धरून राज्यसरकार समाजाची दिशाभूल करण्याचे काम राज्यसरकार करीत असल्याचा आरोपही केरे पाटील यांनी केला. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा म्हणजे आताच्या तेलंगण राज्याचा भाग होता. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण राज्यसरकार देणार नसेल तर मराठवाड्याचा समावेश तेलंगणमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी लवकरच तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांची भेट घेणार आहे. १४ मेपासून संवाद यात्रा काढणारराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आजही आपला विश्वास आहे. त्यांनी समाजाच्या मागण्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी आहे. मात्र ते जर राजकीय समन्वयकांच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करीत असतील तर ती शुद्ध फसवणूक आहे. ही बाब जनतेला सांगण्यासाठी १४ मेपासून मराठवाड्यात संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.