छत्रपती संभाजीनगर : यंदा संगणक प्रणालीद्वारे जि.प. प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तथापि, या प्रक्रियेमुळे शिक्षकांच्या अचूक, वेळेत व पारदर्शक बदल्या होतील, अशी शिक्षकांना अपेक्षा होती. मात्र, सातत्याने परिपत्रके जारी करून बदल्यांच्या प्रक्रियेचे टप्पे वाढविले जात असल्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात बदल्या होणार आहेत का, हा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.
मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी शासनाने एक परिपत्रक जारी करुन थेट २१ मार्च रोजी शिक्षक बदल्यांच्या ऑर्डर जाहीर केल्या जातील, असे नमूद केले आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी बदल्या जाहीर केल्या जाणार होत्या. आतापर्यंतचे बदल्यांचे चारवेळा परिपत्रक बदलण्यात आले आहे. आजचे हे पाचवे परिपत्रक आहे. त्यामुळे आता शिक्षकही कंटाळले आहेत. बदली प्रक्रियेतील सहा टप्पे पूर्ण होत आले आहेत. सध्या अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाचे म्हणणे आहे की, काही शिक्षकांनी अनावधानाने संवर्ग-१ मध्ये बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय न स्विकारल्यामुळे ते अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्प्यात त्यांचा समावेश झाला आहे. अशा शिक्षकांची सरसकट अवघड क्षेत्रात बदल करणे योग्य होणार नाही, अशी विनंती अनेक शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्विकारलेला नाही, अशा शिक्षकांना होकार- नकार देण्यासाठी त्यांना शेवटची संधी देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्याचीही संधी दिली जाणार आहे.
बदल्यांची उत्सुकता मावळलीनवीन परिपत्रकानुसार संवर्ग-१ मध्ये बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय भरलेला नाही, अशा शिक्षकांना होकार- नकार भरण्यासाठी ६ ते ८ मार्चपर्यंत संधी देण्यात आली आहे, तर अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्यासाठी १४ ते १७ मार्चपर्यंत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर बदल्यांचे आदेश २१ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनला पडतील. परिणामी, शिक्षकांना बदल्यांची लागलेली उत्सुकता आता मावळली आहे.