औरंगाबाद : मैत्रिणीसोबत बोलण्याच्या कारणावरून संकेत कुलकर्णी या तरुणाला कारखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संकेत प्रल्हाद जायभायेने कारागृहात ओळख परेडसाठी आलेल्या साक्षीदारांनाच गळा कापून मारून टाकण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. ही घटना २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी हर्सूल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २३ मार्च रोजी सिडको एन-२ येथील कामगार चौक ते महालक्ष्मी चौकदरम्यान मित्रांसह दुचाकीने जाणारा संकेत संजय कुलकर्णी (२०,रा. पाथरी, जि. परभणी) याला आरोपी संकेत जायभाये याने कारखाली चिरडून ठार केले होते. तसेच त्याच्या मित्राला गंभीर जखमी केले होते. विशेष म्हणजे आरोपीने त्याच्या अंगावर वारंवार कार घातली होती. शेकडो लोकांसमोर आरोपीने केलेल्या या खुनाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आरोपी जायभाये आणि त्याच्या साथीदारांना मुकुंदवाडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे.
सध्या संकेत जायभाये आणि त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहे. तपास अधिकारी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी या प्रकरणातील साक्षीदारांना ओळख परेडसाठी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात नेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास कारागृहात दोन सरकारी पंचांसमोर ओळखपरेड सुरू असताना साक्षीदारांनी आरोपी जायभायेला ओळखले. साक्षीदारांनी आपल्याला ओळखल्याचा राग जायभायेला आला आणि त्याने तेथेच साक्षीदाराला धमकावण्यास सुरुवात केली. मी बाहेर आल्यानंतर तुला बघून घेईन,तुला आता मी सोडणार नाही, तुझा गळा कापून टाकेन,अशी धमकी दिली. या धमकीनंतर संबंधित साक्षीदारांनी हर्सूल पोलीस ठाण्यात संकेत जायभायेविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.