वाळूज महानगर : किराणा दुकानात पाण्याची बाटली खरेदीचा बहाणा करुन दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी महिलेचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली. या घटनेनंतर नागरिकांनी भामट्यांचा पाठलागही केला. मात्र, अंधारामुळे हे दोन्ही भामटे फरार झाले.
सिडको वाळूजमहानगरात रेखाबाई भागवत झाडखंडे (५४ रा.स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी) यांचे किराणा अॅण्ड जनरल स्टोअर आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी झारखंडे यांच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत दुचाकी उभी केली. यानंतर काळा जॉकेट घातलेला एक तरुण किराणा दुकानावर गेला तर दुसरा तरुण दुचाकीजवळ उभा होता.
दुकानात गेल्यानंतर त्या अनोळखी तरुणाने रेखा झाडखंडे यांच्याकडे पाण्याच्या बाटलीची मागणी केली. रेखाबाई यांनी त्याला थंड पाण्याची बॉटल दिल्यानंतर त्या तरुणाने ५० रुपयांची नोट दिली.
ही नोट गल्ल्यात टाकत असताना तरुणाने रेखाबाई झाडखंडे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून रस्त्याच्या दिशेने पळ काढला. रेखाबाई यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र, चोरटा त्याचा साथीदाराच्या दुचाकीवर बसून, दोघेही शिवाजी चौकाच्या दिशेने पसार झाले.
तरुणांनी केला भामट्याचा पाठलागरेखाबाई झाडखंडे मदतीसाठी आरडा-ओरडा करताच परिसरात उभ्या असलेल्या नागेश कुकलारे, भागवत झारखंडे व काही तरुणांनी या दुचाकीस्वार भामट्यांचा पाठलाग सुरु केला. यातील काही तरुणांनी या भामट्यांच्या दिशेने दगडही भिरकावले मात्र दोघे भामटे दुचाकीवरुन सुसाट वेगाने फरार झाले.