वाळूज महानगर : ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच लघु उद्योगाद्वारे आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती महिलांना देण्यात आली.
महाराष्टÑ राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियानांतर्गत पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गुरुवारी बचत गटील महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक अशोक घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार तर मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक अर्चना डाले, समन्वयक मिरा तोंडे उपस्थित होते.
अशोक घोडके यांनी महिला ग्रामसंघाची कार्यपद्धती व कर्तव्य आदीविषयी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अर्चना डाले व मिरा तोंडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
सुरवातील महिलांनी गट स्थापन केल्यानंतर ६ महिन्यानंतर या गटाचा समावेश ग्रामसंघात करण्यात येतो. एका महिला ग्रामसंघात ९ महिलांचा समावेश करुन त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे, शासनाकडून अनुदान मिळवून देणे, लघु उद्योग सुरु करण्यासाठी स्वयंसहायता समूहाना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणे, केंद्र व राज्य शासनामार्फत सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांना देणे, १२ रुपयांत पंतप्रधान विमा योजनेचा लाभ देणे, महिलांना घरच्या घरी शिलाई मशिन, पापड, लोणचे तयार करणे, संगणक प्रशिक्षण, मोबाईल दुरुस्ती आदी प्रशिक्षण देणे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मिनाबाई साबळे, सचिव सुषमा खोतकर, कोषाध्यक्षा राधा अवसरमल, छाया पवार आदीसह जवळपास १०० महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक व आभार मिरा तोंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा साळवे, ज्योत्स्ना दवंडे, नितीन सरोदे, मयुर पवार आदीसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.