औरंगाबाद : मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. मंगळवारी शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली.
मेकोरॉट कंपनीला पाण्याशी संबंधित आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आजच्या बैठकीत इस्रायलच्या सदस्यांना सांगितले. मराठवाडापाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत (वॉटर ग्रीड) डॉ. भापकर यांनी इस्राायलचे डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी संवाद साधला. बर्गर, गेलर यांनी इस्रायलमधील पाण्याच्या मूल्यमापनाबाबत पावर पॉइंटवर सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता.
मराठवाड्यातील पीकपद्धतीत बदल, पाण्याशी संबंधित विभाग याबाबत सदस्यांसोबत चर्चा झाली. मराठवाड्यातील सद्य:स्थिती, पाणी वापराची स्थिती व नियोजन याचीही माहिती डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांना बैठकीत दिली. वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार आदींची बैठकीला उपस्थिती होती. बर्गर, गेलर यांनी इस्रायलनी पाणी वापराबाबत सुचविलेल्या उपायांवर आधारित असलेल्या सेठ सिएगललिखित ‘लेट दिअर बी वॉटर’ या पुस्तकाची प्रत आयुक्तांना यावेळी दिली. महासंचालक सिंगला, टाकसाळे, लोलापोड यांनी इस्रायलच्या सदस्यांशी संवाद साधला.
पर्यावरणाचा अभ्यास करणार वाल्मीचे महासंचालक दीपक सिंघला यांनी सांगितले, २ वर्षे ग्रीडसाठी सर्वांगीण माहिती संकलित केली जाणार आहे. वाल्मी आणि आयुक्तालय, गोदावरी महामंडळ येथे सदस्यांसोबत बैठक झाली. मराठवाड्यातील पर्जन्यमान, धरणांची क्षमता, प्रकल्पांची सद्य:स्थिती, पर्यावरणाचा अभ्यास दोन वर्षांमध्ये केला जाणार आहे. इस्रायल येथून सध्या दोन सदस्य आले आहेत. पुढच्या सत्रात त्यांची पूर्ण टीम येईल. ३ दिवसांच्या भेटीवर ते सदस्य आले आहेत. आधारभूत माहितीचे संकलन ते करीत आहेत. वाल्मी, गोदावरी विकास महामंडळात त्यांनी बैठक घेऊन सादरीकरण केले.