रेल्वे उड्डाणपुलाचे काम ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:39 AM2017-09-03T00:39:36+5:302017-09-03T00:39:36+5:30
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि मिक्सर ही वाहने उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी जप्त केल्यामुळे मागील सात दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि मिक्सर ही वाहने उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी जप्त केल्यामुळे मागील सात दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाळू आणि खडीचा अनधिकृत साठा केल्याने तसेच ठेकेदाराने शेत जमिनीचा वापर करताना अकृषिक कर भरला नसल्याचे कारण पुढे करीत भोसले यांनी ही कारवाई केली आहे. पुलाच्या कामासाठी लागणारी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावल्याने पुलाचे काम ठप्प झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. हे काम पूर्ण झाल्यास पालम नाका रेल्वे फाटकावरील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. २०१९ पर्यंत काम पूर्ण करुन पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने कामाला गती दिली होती. मात्र २७ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी शहरापासून जवळ असलेल्या इसाद रोडवर ए.जी.कन्स्ट्रक्शनच्या साईटवर छापा टाकून तेथील आणलेली वाळू व खडी कोणाकडून खरेदी केली, अशी विचारणा करीत मिक्सर, जेसीबी मशीन जप्त करुन पोलीस ठाण्यात लावले. दुसरे दिवशी साईटवर असलेल्या खडी आणि वाळूचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ए.जी.कन्स्ट्रक्शनच्या नावे ८७ लाख ४५ हजार ५०० रुपयांच्या दंडाची नोटीस पाठविल्याची माहिती मिळाली आहे.