औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सहा महिन्यांत सुरू होईल. रेल्वेकडून करण्यात येणाºया कामात पर्यटन मंत्रालयाकडून होणारे काही कामे जोडण्यात आली आहेत. त्याची एजन्सी नेमण्यात आली आहे. रेल्वेस्टेशनवर आणखी चार सरकते जिने बसविण्यात येणार आहेत, असे ‘दमरे’चे नवनियुक्त महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या म्हणाले.
महाव्यवस्थापकपदी रुजू झाल्यानंतर शनिवारी गजानन मल्ल्या यांनी नगरसोल ते नांदेडदरम्यानच्या रेल्वेस्टेशनची पाहणी केली. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सकाळी १० वाजता ते दाखल झाले. यावेळी प्रारंभी त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनांबरोबर संवाद साधून मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गजानन मल्ल्या म्हणाले, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्यास मनमाड येथून विरोध होत आहे. त्यामुळे नांदेडहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करण्याचा पर्याय आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु मुंबईत खूप रेल्वे धावतात. कल्याण, पनवेलपर्यंत रेल्वे सोडून उपयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत रेल्वे धावली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या रेल्वेची घोषणा केली जाईल. पुणे, नागपूरसाठीही रेल्वेची मागणी आहे. परंतु पुण्याचा मार्ग लांब आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसच्या बोगी १८ वरून २१ ते २४ पर्यंत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मल्ल्या म्हणाले.
यावेळी रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर, नमो रेल्वे संघटनेचे गौतम नहाटा, प्रफुल्ल मालाणी, राहुल मोगले, राजकुमार सोमाणी, रेल्वेस्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप साबळे आदींसह नांदेड विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबईसाठी नवीन रेल्वे, पीटलाईन, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा, पोलीस चौकीची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. गजानन मल्ल्या यांनी आरक्षण कार्यालय, पार्किंग, वेटिंग रूम, सीसीटीव्ही कक्षाची पाहणी केली.