एडी फार्मा कंपनीतील विषारी वायूमुळे कामगारांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:36 PM2019-08-03T23:36:37+5:302019-08-03T23:37:16+5:30

वाळूज एमआयडीसीतील एडी फार्मा कंपनीतील चिमणीद्वारे शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. हवेबरोबर हा विषारी वायू इतरत्र पसरल्याने कंपनीतील कामगारांसह लगतच्या कंपन्यांतील कामगारांना उलट्या, चक्कर येणे सुरू झाल्याने उद्योगनरीत चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने काही कामगारांना सुटी देऊन घरी पाठविले.

Workers barred from poisonous gas at Eddie Pharma Company | एडी फार्मा कंपनीतील विषारी वायूमुळे कामगारांना बाधा

एडी फार्मा कंपनीतील विषारी वायूमुळे कामगारांना बाधा

googlenewsNext
ठळक मुद्देवाळूज एमआयडीसी : अनेक कामगारांना चक्कर व उलट्यांचा त्रास

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एडी फार्मा कंपनीतील चिमणीद्वारे शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. हवेबरोबर हा विषारी वायू इतरत्र पसरल्याने कंपनीतील कामगारांसह लगतच्या कंपन्यांतील कामगारांना उलट्या, चक्कर येणे सुरू झाल्याने उद्योगनरीत चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने काही कामगारांना सुटी देऊन घरी पाठविले.
वाळूज उद्योगनगरीतील जी-सेक्टरमधील एडी फार्मा या कंपनीत औषधी उत्पादन करण्यात येते. शनिवारी दुपारी चिमणीद्वारे पिवळसर विषारी वायू बाहेर पडण्यास सुरुवात झाली. जवळपास दीड ते दोन तास विषारी वायू बाहेर पडत होता. काही वेळातच हवेत पिवळसर रंगाचे लोळ दिसू लागले. हा विषारी वायू परिसरात पसरल्यामुळे एडी फार्मा कंपनीसह लगतच्या सिग्मा इंजिनिअर्स, शुभनील इंडस्ट्रीज, इन्मान आॅटोमेशन, एस.एस. कंट्रोल सिस्टीम, कॅलिब्रो मेझ्युअर आदी कंपन्यांतील कामगारांना डोळ्यांची जळजळ होऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेले कामगार, तसेच उद्योजक कंपनीतून धावत रस्त्यावर आले; परंतु हवेत विषारी वायूचे प्रमाण अधिक वाढल्याने कामगारांना जास्तच त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे उद्योजक व कामगारांची चांगलीच धांदल उडाली. अनेक ांनी धावाधाव सुरू केली.
हा प्रकार एडी फार्मा कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने त्यांनी तांत्रिक दुरुस्ती करून बाहेर पडणाऱ्या विषारी वायू बाहेर पडणे थांबवले. जवळपास दोन ते तीन तासांनंतर हवेतील वायूचे प्रमाण कमी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, उशिरापर्यंत याचा प्रभाव जाणवत होता. एक ते दीड वर्षापूर्वी अशीच घटना घडून त्रास होत असल्याने अनेक कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले होते.
कामगारांना दिली सुटी
शनिवारी घातक विषारी वायूमुळे एडी फार्मा कंपनीतील कामगारांसह लगतच्या कंपन्यांतील कामगारांनाही डोळ्यांची जळजळ होणे, मळमळ, उलटी, चक्कर येणे, तसेच श्वसनाचा मोठा त्रास झाला. त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. सिग्मा इंजिनिअर्स कंपनीतील पवन श्रीवास्तव व अजय कुमार या कामगारांना उलट्यांचा त्रास झाला, तर विजय कोल्हे, अफसर शेख, माधवी चित्रे, वर्षा लहाने, दीक्षा पवार, रेणुका सूर्यवंशी या कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने कंपनी व्यवस्थापनाने सुटी देऊन घरी पाठविले, असे कंपनीतील मंगेश घाटे यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला नो एन्ट्री
हा घातक विषारी वायू बाहेर पडत असल्याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर प्रतिनिधीने कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी प्रतिनिधीला कंपनीच्या गेटसमोरच रोखून धरले. साहेब उद्या तुम्हाला भेटायला येणार असल्याचे सांगत कंपनीत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे समजू शकले नाही.

प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष
हा प्रकार रात्रीच्या वेळी दररोज सुरू असून, गुरुवारी व शुक्रवारी याची तीव्रता जास्त असते. एडी फार्मा कंपनी व्यवस्थापनाला याविषयी वारंवार सांगूनही यावर कंपनीकडून काहीच उपाययोजना केली जात नाही. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तरीही याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, अनेकांना शारीरिक बाधा झाली आहे, तसेच अनेक इंजिनिअर या त्रासामुळे कंपनी सोडून गेले आहेत, असे या परिसरातील शिरीष कुलकर्णी, आशिष पाल, सुदांश शेवरे, शशिकांत थेटे आदी उद्योजकांचे म्हणणे आहे.
पाहणी करून कारवाई करणार
याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी प्रदीप वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारी (दि.५) सदरील कंपनीची पाहणी करून काही त्रुटी आढळून आल्यास संबंधित कंपनीविरुद्ध नियामानुसार कारवाई केली जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 

Web Title: Workers barred from poisonous gas at Eddie Pharma Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.