अध्यक्षांकडून सदस्यांना कामांचे चॉकलेट

By Admin | Published: December 20, 2015 11:43 PM2015-12-20T23:43:17+5:302015-12-20T23:58:05+5:30

विजय सरवदे, औरंगाबाद स्थानिक काँग्रेस आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा रोष मावळला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

Workers' Chocolate to members | अध्यक्षांकडून सदस्यांना कामांचे चॉकलेट

अध्यक्षांकडून सदस्यांना कामांचे चॉकलेट

googlenewsNext

विजय सरवदे, औरंगाबाद
स्थानिक काँग्रेस आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा रोष मावळला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या तरी सत्ताधारी आणि विरोधी, अशा दोन्ही पक्षांतील सदस्य चिडीचूप आहेत. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत कोणीही गदारोळ करू नये, यासाठी गोंधळी सदस्यांना सिमेंट बंधाऱ्यांचे ‘चॉकलेट’ देऊन समजूत काढण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केला. असे असले तरी सर्वसाधारण सभेला आता काही तासांचा अवधी शिल्लक असतानादेखील सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी अध्यक्षांनी अद्यापही ‘प्रीजीबी मीटिंग’ बोलावलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी घटक पक्षांतील सदस्यांच्या मनात सध्या तरी अध्यक्षांविरुद्धचा असंतोष खदखदत आहे, हे मात्र नक्की!
जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सर्व सदस्यांची नाडी ओळखली आहे. ते सदस्य सत्ताधारी असो की विरोधी. बैठकांमध्ये गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना तुटपुंज्या स्वरुपाची कामे देऊन गप्प बसविण्यामध्ये महाजन तरबेज आहेत. एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका वटवताना सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या शिवसेना सदस्यांनीही मिळेल त्यावर समाधान मानून नांगी टाकली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नावालाच उरलेला आहे.
दुसरीकडे, सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी मध्यंतरी अध्यक्ष हे अकार्यक्षम आहेत, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणायचा म्हणून काही असंतुष्टांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार घडलाच तर सध्याचे दिवस काँग्रेससाठी बरे नाहीत म्हणून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी १२ डिसेंबर रोजी समन्वय समितीची बैठक घेतली. या बैठकीत असंतुष्ट सदस्यांची समजूत काढून अध्यक्षांना सदस्यांची कामे करण्याबाबत चांगलीच समज दिली.
दुसऱ्या दिवसांपासून अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सत्ताधारी घटक पक्षातील एकेका नाराज सदस्याला बोलावून सिमेंट बंधाऱ्यांची नवीन कामे व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामे देण्याचे आमिष दाखविले. या घटनेला ८ दिवसांचा कालावधी होत आला. कोणाला किती निधी द्यायचा, यासंबंधीच्या नियोजनाला अद्यापही मूर्त स्वरूप आलेले नाही.
यादीनुसार सदस्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही. सर्वसाधारण सभेला ३६ ते ४० तासांवर अवधी शिल्लक राहिलेला आहे. या सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी पूर्व सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज सदस्यांच्या असंतोषाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.

Web Title: Workers' Chocolate to members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.