- योगेश पायघन
औरंगाबाद : कोरोनाबाधितांत विषेशतः अति गंभीर, आजाराची गुंतागुंत आणि बाधित मृतांत मधुमेह असलेल्यांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. बदलती जीवनशैली आणि संतुलित आहार, व्यायाम, औषधोपचाराकडे दुर्लक्ष, वाढत्या लठ्ठपणामुळे मधुमेह रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरतोय. त्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहतज्ज्ञांशी लोकमतने संवाद साधला. जिल्ह्यात मधुमेहींच्या केलेल्या एका अभ्यासात ८०० मधुमहींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी ४८२ रुग्णांची रक्तातील शुगर नियंत्रणात नव्हती. तर सोबतच ५५ टक्के रुग्णांना रक्तदाब आणि ४० ते ४५ टक्के रुग्णांना लठ्ठपणा आढळून आला. तर ६० टक्के लोकांत मेटॅबाॅलिक सिन्ड्रोम होता. म्हणजे मधुमेहासोबत रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्ट्राॅलच्या व्याधींपैकी एक व्याधी जडलेली दिसून येते. याला प्रामुख्याने वजन वाढणे, दिलेले औषधोपचार वेळेवर न करणे, आहारातील पथ्य न पाळणे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष कारणीभूत आहे, असे मधुमेह व आंतरग्रंथीतज्ज्ञ डाॅ. नीलेश लोमटे यांनी सांगितले.
मधुमेह येण्याआधी टाळा एकविसावे शतक मधुमेह व लठ्ठपणा असे डायबेसिटीचे युग आहे. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला शरीरात इन्सुलीनच्या हार्मोन्सची उत्पतीच होत नाही आणि दुसरा इन्सुलीनची उत्पत्ती होते; परंतु त्याची कार्यक्षमता कमी असते. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आता प्राैढच नव्हे तर लहान मुलांतही आढळून येत आहे. जगात चीननंतर भारतात सर्वाधिक मधुमह रुग्ण आहेत. ६९ दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत जाणारा बालवयातील लठ्ठपणा आहे. बालवयातील लठ्ठपणामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राैढांच्या तुलनेत बालमधुमेहींमध्ये दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आव्हानात्मक आणि हानिकारक आहे. त्यामुळे तो येण्याआधी टाळला पाहीजे, असे बालस्थूलतातज्ज्ञ डाॅ. प्रीती फटाले यांनी सांगितले.
लठ्ठपणावर नियंत्रण गरजेचे सद्य:स्थितीत मधुमेहाचे प्रमाण १० टक्के आहे; पण त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. साठ टक्के मधुमेही रुग्णांना मेटॅबाॅलिक सिन्ड्रोम आहे. वाढते वजन त्याला कारणीभूत ठरताना दिसते. योग्य आहार, पथ्य, व्यायाम, नियमित औषधोपचार गरजेचा आहे. लठ्ठपणा वाढू न दिल्यास मधुमेहही नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. कोरोना काळात मधुमेह असलेल्या रुग्णांना संसर्ग होणार नाही यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या प्रतिबंधक उपाययोजनांकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष देण्याची आहे. - डॉ. नीलेश लोमटे, आंतरग्रंथी व मधुमेहतज्ज्ञ