- संजय जाधव
पैठण : जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षाचे आगमन लांबले असून ऑक्टोबर महिन्यांच्या मध्यापर्यंत हजारोच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षाच्या अधिवासावर आलेली बंधने व हवामानातील बदलाचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसला आहे.
दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे आगमन यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही न झाल्याने पक्षीमित्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. युरोप, रशिया, सौदी अरेबिया यासह आशिया खंडाच्या विविध भागात हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते. पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा भासतो. त्यामुळे दरवर्षी तेथील पक्षी जायकवाडी धरणावर स्थलांतर करतात. साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यानंतर हे पक्षी जायकवाडी धरणाच्या जलाशयावर दिसून येतात पुढे फेब्रुवारीअखेर पर्यंत ते मुक्काम ठोकतात.
देशी-विदेशी पक्षाचे आगमन संथगतीनेनाथसागराचा दागिणा म्हणून गौरविण्यात आलेला फ्लेमिंगो उर्फ रोहीत पक्षाचे आगमन अद्याप न झाल्याने पक्षिमित्र हिरमुसले आहेत. जलाशयावर दरवर्षी हजारोच्या संख्येने येणारी बदके, करकोचे, कुराव, सुरेय हे पक्षी दुर्मिळ झाले आहेत स्थानिक पक्षात मुग्धबलक,चमचा, शराटी, सुरय, कूरव, शेकाट्या, धनवर बदक, पान कावळे, राखी सारंग,रंगीत करकोचे हे यंदा कमी संख्येने दिसून येत आहेत. तसेच वारकरी बदक,पाणकोंबडी, पानडुबी, पाणभिंग्री या पक्षाचे तर अद्याप दर्शन झालेले नाही. परदेशी पक्ष्यांमध्ये माळ भिंगरी, किरा, तुत्वार, पट्टेरी हंस, थापट्या बदक, मत्स्य गरुड, पायमोज गरुड, पान घार ,पानलावा, पान टीवळा हे पक्षी कमी संख्येने आले आहेत. क्रौंच पक्षी, तरंग बदक,चक्रांग बदक,तलवार बदक,भुवई बदक,हिरवा तूटवार हे सुध्दा जलाशयावर दिसले नाहीत. पक्षीप्रेमींसाठी हिवाळी पाहुण्यांचे पक्षी संमेलन म्हणजे पर्वणीच असते. बार हेडेड गुज, पिनटेल, पोचार्ड, जॅगवेल, सँड पायपर, ग्रीन शॅक, रेड शॅक, व्हॅगटेल, चक्रवाक अशा पक्ष्यांना टिपण्यासाठी छायाचित्रकार जायकवाडी पक्षीअभयारण्यात वेळ घालवतात यंदा मात्र पक्षांची आतुरतेने प्रतिक्षा करण्यात येत आहे.
पक्षांच्या अधिवासावर अतिक्रमणजायकवाडी धरण १००% भरलेले असून लगतच्या गाळपेरा क्षेत्रात शेती होत असल्याने पक्षांना यंदा उतरण्यासाठी जागा राहिलेली नाही. शिवाय शेंद्रा औद्योगिक वसाहत, जालना पाणीपुरवठा योजनासहीत अनेक योजनाच्या ईमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामामुळे पक्ष्यांची बसण्याची हक्काची जागा हिरावली गेली आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत पक्षांचे आगमनगेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यासकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. रशिया, उत्तर युरोप, मंगोलिया, कॅनडा, चीन आणि जपानच्या काही भागातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. पूर्वी जमिनीवर तीन फूटपर्यंत उंचीचे बर्फाचे थर पाहायला मिळायचे. आता त्यांची जाडी कमी झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे जगाच्या हवामानावर परिणाम होत आहे. यंदा डिसेंबर अखेरपर्यंत धरणावर पक्षाचे बऱ्यापैकी आगमन होईल अशी आशा आहे. - पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक