व्वा..! छत्रपती संभाजीनगरातून आता दीड तासांत पोहोचा अहमदाबादेत
By संतोष हिरेमठ | Published: April 1, 2024 03:45 PM2024-04-01T15:45:04+5:302024-04-01T15:46:36+5:30
विमानसेवा सुरू : पहिल्याच दिवशी प्रतिसाद, ३ वर्षांनंतर पुन्हा ‘टेकऑफ’
छत्रपती संभाजीनगर : कोरोना प्रादुर्भावात बंद पडलेली अहमदाबादसाठी तब्बल ३ वर्षांनंतर शहरातून रविवारपासून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विमानसेवेमुळे आता शहरातून अवघ्या दीड तासांत अहमदाबादेत पोहोचता येत आहे.
छत्रपती संभाजीनगरहून उद्योग, व्यापार आणि पर्यटनासाठी अहमदाबाद, तसेच गुजरातमधील अन्य शहरांत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत रस्ते मार्गानेच अहमदाबादला जावे लागत होते; परंतु आता शहरातून विमानाने अवघ्या दीड तासांत अहमदाबाद गाठता येईल. कोरोना प्रादुर्भावात ही विमानसेवा बंद पडली होती. इंडिगोने अखेर ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू केली.
हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ
अहमदाबाद विमानसेवेमुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी आता विमानसेवा उपलब्ध झाली आहे. आता उदयपूरसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. शहराहून तब्बल २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोरोनापूर्वी ही विमानसेवा सुरू झाली होती.
पहिल्या दिवशी किती प्रवासी?
पहिल्याच दिवशी या विमानाने अहमदाबादहून ६१ प्रवासी शहरात दाखल झाले, तर छत्रपती संभाजीनगरातून ५५ प्रवासी अहमदाबादला गेले.
आणखी प्रवासी वाढतील
३ वर्षांनंतर सुरू झालेले अहमदाबाद विमान अखेर रविवारपासून सुरू झाले. या विमानाची आसन क्षमता ७८ आहे. पुढे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप.
उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्नशील
अहमदाबाद विमानसेवा अखेर पुन्हा एकदा सुरू झाली. आता उदयपूर विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हिवाळी वेळापत्रकात ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन.