राँगसाईड सुसाट जाणे ठरले धोकादायक; बीड बायपासवर भीषण अपघातात एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:48 PM2018-06-14T18:48:58+5:302018-06-14T18:50:12+5:30
राँगसाईड जाणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाने चिरडल्याची घटना आज दुपारी बीड बायपास रस्त्यावर घडली.
औरंगाबाद : राँगसाईड जाणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाने चिरडल्याची घटना गुरूवारी दुपारी बीड बायपास रस्त्यावरील एमआयटी कॉलेज ते निशांत पार्क हॉटेलदरम्यान घडली.
शाम छगनलाल बाहेती (३८,रा.गादिया विहार)असे मृताचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना सातारा पोलिसांनी सांगितले की, शाम बाहेती हे आलू चिप्स विक्रीचा व्यवसाय करायचे. गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२०बीडी ७३०९) बीड बायपास रस्त्यावरील हॉटेल निशांत पार्ककडून एमआयटी कॉलेजकडे राँगसाईडने जात होते. त्याचवेळी एमआयटी कॉलेजकडून देवळाई चौकाकडे मालवाहू ट्रक (क्र मांक टीएन १०-४२०९) सुसाट जात होता. या ट्रकच्या उजव्या बाजूनेही दुसरा ट्रक होता.
दोन ट्रक समांतर रेषेत आणि वेगात जात असताना अचानक राँगसाईडने जाणाऱ्या दुचाकीस्वार शाम यांना वाटले की, ट्रकचालक त्यांच्यासाठी रस्ता सोडेल तर ट्रकचालकाला वाटले की, दुचाकीचालक हे त्यांच्याकरीता रस्ता सोडून तो रस्त्याच्या खाली उतरेल. मात्र दोन्ही वाहनांच्या चालकांनी परस्परांसाठी रस्ता सोडला नाही. आणि त्यांच्यात समोरा-समोर जोराची धडक झाली. या भिषण अपघातात शाम खाली कोसळले आणि ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.