यमनच्या जावयाला 'मुक्काम' पडला महागात; ८ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या भारतात, लग्नही केले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 06:03 PM2022-05-07T18:03:05+5:302022-05-07T18:03:59+5:30
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ८ वर्षांपासून औरंगाबादेत वास्तव्य उघडकीस आल्याने कारावासाची शिक्षा
औरंगाबाद : व्हिसाची मुदत संपल्यानंतरदेखील ८ वर्षांपासून भारतात बेकायदेशीररीत्या राहणारा यमनचा तरुण अली मोहम्मद अवद बीन हिलाबी (३१, रा. अबरार कॉलनी, बीड बायपास रोड मूळ रा. सना- ६०, यमन) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी ‘विदेशी नागरिक कायद्याच्या कलम १४ अन्वये’ एक वर्ष, एक महिना ६ दिवसांचा कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे न्यायलयाने आरोपीला शिक्षेविरोधात अपील करण्याची मुभा देऊन त्याचा पासपोर्ट परत करून त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही दिले आहेत.
याबाबत सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कारभारी नलावडे (५०) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी सेलकडून नियमितपणे विदेशी नागरिकांची तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान, यमन येथील ४ नागरिक शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी चौघांच्या कागदपत्रांची तपासणी करून चौकशी केली असता आरोपी अली मोहम्मद अवद हा गेल्या ८ वर्षांपासून अवैधरीत्या भारतात राहत असल्याचे समोर आले होते. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक दासरे यांनी तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. न्यायालयाने आरोपी अली मोहम्मद याला दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार व्ही.बी. साळवे यांनी काम पाहिले.
बनावट नागरिकत्व
विशेष म्हणजे आरोपीने शहरातील तरुणीशी विवाह करून संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडे पोलिसांना भारताचे मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आढळून आले आहे. या पुराव्याआधारे त्याने भारताचे बनावट नागरिकत्व सिद्ध करण्याचा असफल प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.