औरंगाबाद : हर्सूल कारागृहात योगेश राठोड या कैद्याला कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचे आपण स्वत: पाहिले. मात्र, चौकशी अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांनी आपला जबाब नोंदविला नाही. कारण कारागृह प्रशासनाने आम्हाला तपास अधिकाऱ्यांसमोर जाऊ दिले नाही, असा खळबळजनक आरोप खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आणि सध्या संचित रजेवर असलेला कैदी जयदीप वगार याने येथे पत्रकार परिषदेत केला.
जाधववाडी येथील रहिवासी योगेश राठोड हा न्यायालयीन बंदी १७ जानेवारी रोजी हर्सूल कारागृहात दाखल झाला होता. १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता योगेशला गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास योगेशचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी योगेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
कारागृह पूर्व विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी घटनेची अंतर्गत चौकशी करून वरिष्ठांना गोपनीय अहवाल सादर केला. हर्सूल पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत असताना अधिकारी, कैदी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले. मात्र, सर्वांनी योगेश राठोडला फिट आल्याचा जबाब नोंदविला.
या तपासात मात्र कोणतीही प्रगती पोलिसांनी केली नाही आणि योगेशच्या मृत्यूप्रकरणी आजपर्यंत कोणालाही अटक झाली नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी राहुल शंकरराव वाढवे आणि कैदी जयदीप वगार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, कारागृहात कैद्यांवर अन्याय होतो. शाकाहारी कैद्याच्या नावे तो मांसाहार करीत असल्याचे दाखवून भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप केला.
याबाबत बंदी हरिश्चंद्र इंगळे यांनी तक्रार केली आहे. योगेश राठोडला मारहाण झाली त्यावेळी आपण नातेवाईकांना फोन लावण्यासाठी माझ्यासह सागर बेग, मुकेश चंडालिया आणि महंमद हे कैदी तेथे होतो, असा दावा जयदीप वगारने केला. तुरुंगाधिकारी आशिष गोसावी आणि अन्य जवानांनी योगेशला मारहाण केल्याचे आम्ही पाहिले, असे जयदीप वगार याने पत्रकारांना सांगितले. मात्र, जबाब नोंदविण्यात आला नाही, असे जयदीपचे म्हणणे आहे. याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे राहुल वाढवे यांनी सांगितले.