औरंगाबाद : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिलांच्या सुरक्षे संबंधित शेअर केलेल्या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनीऔरंगाबादेतून शुक्रवारी अटक केली. शशिकांत जाधव असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोनाक्षीच्या तक्रारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी तिने इंस्टाग्रामवर महिला सुरक्षेसंबंधित जनजागृतीपर व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर जाधवने अभिनेत्री बाबत अश्लील टिका टिप्पणी केली. ही बाब लक्षात येताच सोनाक्षीने मुंबईत सायबर पोलिसांकड़े तक्रार दिली. त्यानुसार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद खोपीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल गायकवाड़ यांनी तपास सुरु केला.
तांत्रिक पुराव्याच्या आधारे, तो औरंगाबाद शहरातील असल्याचे समोर आले . यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद शहरात येऊन तुळजाईनगर येथून शशिकांतला उचलले. पोलिसांनी पकडल्यानंतर शशिकांतने त्याने केलेल्या अश्लील टिप्पणी खूप मोठी चूक होती असे सांगितले. यापुढे महिलांचा सन्मान करणार असल्याचे नमूद केले. तर सोनाक्षी सिन्हाने या कारवाईनंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.