शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:23 AM2020-02-20T11:23:19+5:302020-02-20T11:26:45+5:30

दोन पैकी एक आरोपी अटकेत,एक फरार

Youth murder in Shiv Jayanti's rally at Aurangabad | शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक

शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपुंडलिकनगर रस्त्यावरील घटनेने खळबळ एक आरोपी अद्याप फरार आहे

औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हनुमाननगर चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावरील नागापूरकर दवाखान्यासमोर घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली.

श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर), असे मृताचे नाव आहे. श्रीकांत  हा शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत होता. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी तो मित्रांसोबत घराबाहेर पडला होता.  हनुमाननगरकडून पुंडलिकनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. तेथील नागापूरकर हॉस्पिटलसमोर अनोळखी तरुणांसोबत त्याचे भांडण झाले. यावेळी मिरवणुकीतील तरुण डी.जे.च्या तालावर नाचत असताना आरोपीने अचानक श्रीकांतच्या छातीत चाकू खुपसला. या घटनेत श्रीकांत खाली कोसळताच मारेकरी तेथून पसार झाले.

या घटनेची माहिती सोबतच्या मित्रांनी त्याच्या घरी कळविली. यानंतर त्याच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन श्रीकांतला बेशुद्धावस्थेत एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रात्री ८.५० वाजता श्रीकांतला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे आणि इतरांनी घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी श्रीकांतचे शव घाटी रुग्णालयात दाखल केले. याविषयी मृताचा भाऊ सूरज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीकांत होता धाकटा मुलगा
मृत श्रीकांतचे वडील गोपीचंद हे वाळूज एमआयडीसीमधील एनआरबी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा मोठा मुलगा मयूर पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर मधला मुलगा सूरज  पैठण एमआयडीसीतील फार्मा कंपनीत नोकरी करतो. धाकटा श्रीकांत हा बी.ए.चे शिक्षण घेत होता. 

पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्याची घटनास्थळी धाव
शिवजयंती मिरवणुकीत तरुणाची हत्या झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मारेकऱ्याला पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने चार पथके रवाना करण्यात आली. यात गुन्हे शाखेची दोन पथके आहेत.

एका आरोपीस अटक, एक फरार 
दरम्यान, श्रीकांतच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले आहे. विजय शिवाजी वैद्य असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राहुल सिद्धेश्वर भोसले असे फरार आरोपीचे नाव आहे. पोलिसांची चार पथके कसून शोध घेत आहेत.

Web Title: Youth murder in Shiv Jayanti's rally at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.