मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये १८ आणि २३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत नवमतदारांचा कौल निर्णायक राहणार आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान ५० हजारांपासून ते लाखांवर हे मतदार असल्याने उमेदवारांचे लक्ष या नवमतदारांकडे असणार आहे. सर्वात कमी ४५ हजार ५७५ इतके नवमतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये असून सर्वाधिक २ लाख ६३ हजार नवमतदार नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. या मतदारांना कुठला उमेदवार आकर्षित करतो, तोच उमेदवार यशस्वी होणार आहे.
औरंगाबादमध्ये वाढलेल्या मतदारांचा आकडा मोठा
- विकास राऊत लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून यावेळी ४५ हजार ५७५ इतके नवमतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यांचा कौल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे २००९ मध्ये देखील २३ एप्रिल रोजीच मतदान झाले होते. १० वर्षांपूर्वीच्या निवडणुकीनंतर यावेळीही तरुणाईचे मतदान निर्णायक असणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६ लाख १२ हजार १५३ मतदार २० ते २९ या वयोगटातील असून, १८ ते १९ या वयोगटातील ४५ हजार ५७५ मतदार आहेत. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत ‘मोदी लाटे’मुळे मतदानाची दिशा बदलली होती; परंतु २००९ मध्ये जी निवडणूक झाली होती, त्यामध्ये काट्याचा टक्कर होती.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये कन्नड, औरंगाबाद मध्य, पश्चिम आणि पूर्व, गंगापूर, वैजापूर मतदारसंघांचा समावेश आहे. सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदारसंघात ९ लाख २२ हजार २५ मतदान असून, यातील सुमारे ३ लाख मतदार तरुण आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तरुण मतदारांचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे.
2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. त्यांना २ लाख ५५ हजार ८९६ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंग पवार यांना २ लाख २२ हजार ८८२ मते मिळाली होती. शांतिगिरी महाराज यांना १ लाख ४८ हजार २६ मतदान मिळाले होते. २२ उमेदवार त्यावेळी निवडणूक रिंगणात होते. १४ लाख १६ हजार ९६४ एकूण मतदारांची संख्या त्यावर्षी होती. १५३६ मतदान केंद्र त्या निवडणुकीत होते. 4,30,000 तरुण मतदारांनी २००९ साली झालेल्या निवडणुकीत निर्णायक कौल दिला होता. १० वर्षांनंतर ६ लाख ५७ हजार ७२८ तरुण मतदार निर्णायक कौल देत खासदाराची निवड करणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षांचे पहिल्यांदाच मतदान करणारे ४५ हजार ५७५ मतदार आहेत.
बीडमध्ये युवा मतदारांची भूमिका महत्त्वाची
- सतीश जोशी बीड लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत या निवडणुकीत १ लाख ९६ हजार १८३ मतदारांची वाढ झाली असून, १६ मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यात भर पडणार आहे. हे सर्व युवा मतदार असून त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. मोठ्या संख्येने सुशिक्षित असलेल्या या युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. २०१४ मध्ये मतदारांची संख्या १८ लाख ३२ हजार १५६ इतकी तर सध्या २० लाख २८ हजार ३३९ म्हणजे १ लाख ९६ हजार १८३ इतके युवा मतदार वाढले आहेत. २००४ चा अपवाद वगळला तर २००९ मध्ये भाजपचे उमेदवार जवळपास दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. २०१४ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या डॉ.प्रीतम मुंडे जवळपास ७ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने काँग्रेसचे अशोक पाटील यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या.
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाचे प्रकाश सोळंके यांचा जवळपास ४७ हजार मतांनी पराभव करून विजयाची हॅटट्रिक केली होती. १९९८ आणि १९९९ मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले होते. २००९ मध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांचा १ लाख ४० हजार मतांनी, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे सुरेश धस यांचा १ लाख ३६ हजार मतांनी पराभव केला होता.
6,00,000 मतांचे गणितवाढलेल्या जवळपास दोन लाख युवा मतदारांना आकर्षित करून आपल्याकडे वळवून घेण्यासाठी उमेदवारांचा जाहीरनामा महत्त्वाचा ठरणार आहे. प्रचारातही या मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.हे मतदार आपल्या घरातील मतांवरही प्रभाव टाकू शकतात. म्हणजे या युवा मतदारांच्या घरातील किमान दोन मते जरी गृहीत धरली तर जवळपास चार लाख मतांना ते आपल्या आवडीप्रमाणे वळवू शकतात. म्हणजे सहा लाख मतांचे हे गणित आहे. आजही युवा पिढीच्या प्रभावाखाली आई, वडील, भाऊ, बहिणी हे मतदार असतात. याचा अनुभव २०१४ च्या निवडणुकीतही आला होता.
लातूरमध्ये रोजगाराच्या उंबरठ्यावरील मतदारांना कोण प्रभावित करणार?
- हणमंत गायकवाड लातूर लोकसभा मतदारसंघात यंदा १ लाख ८१ हजार ७८६ नवमतदार वाढले असून, गत निवडणुकीतील जय-पराजयातील फरक लक्षात घेता नवमतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, यावर चित्र बदलू शकते. रोजगाराच्या उंबरठ्यावर असणाऱ्या नवमतदारांना कोण प्रभावित करतो, हा कळीचा मुद्दा असेल.
२००४ आणि २००९ च्या निवडणुकीतील उमेदवारांच्या मतांचे अंतर पाहता काँग्रेस, भाजपमध्ये कमालीची चुरस झाल्याचे चित्र होते. २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा ३० हजार ८९१ मतांनी पराभव झाला होता. देशात काँग्रेसने सरकार स्थापन केले, मात्र लातूरमध्ये भाजपाच्या रुपाताई निलंगेकर विजयी झाल्या होत्या. राखीव लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर २००९ ची पहिली निवडणूक. या लढतीत काँग्रेसचे जयवंतराव आवळे यांनी ७ हजार ९७५ मतांनी भाजपच्या सुनील गायकवाड यांचा पराभव केला होता. प्रदीर्घ काळ काँग्रेसच्या बाजूने राहिलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला. मात्र, २००९ ला पुन्हा काँग्रेसने गड राखला.
2014 च्या लाटेचा अपवाद वगळता लातूर लोकसभेत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. गत निवडणुकांतील सामना लक्षात घेता नवमतदार काँग्रेसकडे झुकतो की भाजपकडे, यावर जय-पराजय अवलंबून राहणार आहे. महाआघाडीतील अन्य पक्षांना गत निवडणुकीत पडलेले मतदान यंदाच्या निवडणुकीत कसे वळेल, यावरही बरेच काही अवलंबून आहे. प्रामुख्याने नवमतदार हे रोजगाराच्या दृष्टीने नेत्यांच्या आश्वासनांनी आश्वस्त होतात की, विरोधात कौल देतात, यावर निकाल लागू शकतो.
उस्मानाबादमध्ये नवे रक्त वाढविणार कुणाचा रक्तदाब?
- चेतन धनुरे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यापूर्वी रक्तदाब वाढविणाऱ्या ‘हाय व्होल्टेज’ लढती झाल्या आहेत़ यावेळीही अशाच लढतीची शक्यता वर्तविली जात आहे़ यामध्ये नवीन मतदारांची संख्या तब्बल सव्वालाखावर वाढली आहे़ त्यांच्या मताचे दान कुणाच्या पारड्यात पडते, यावर विजयाचे समीकरण जुळणार आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबर चुरस आहे़ २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंसारख्या दिग्गजाला अवघ्या १ हजार ६४९ मतांच्या फरकाने पराभव पहावा लागला होता़ २ लाख ९४ हजार ४३६ मते मिळवीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे निवडून आल्या़ अगदी अशीच झुंज २००९मध्येही पाहायला मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ़पद्मसिंह पाटील यांनी ४ लाख ८ हजार ८४० मते घेऊन सेनेच्या प्रा़ रवींंद्र गायकवाड (४,०२,०५८ मते) यांच्यावर अवघ्या ६ हजार ७८७ मतांनी मात केली होती
गतवेळी मोदी लाटेत सव्वादोन लाखांवर मताधिक्य घेऊन सेनेचे रवींद्र गायकवाड विजयी झाले़ मात्र यावेळी २०१४ सारखी लाट नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगण्याची चिन्हे आहेत़ यात नवमतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे़ यावेळी तब्बल १ लाख ३२ हजार १९५ मतदार वाढले आहेत़ 2004 व २००९ मधील काट्याची लढत लक्षात घेता नवमतदारांचा कलच विजयाचे गणित जुळवून देऊ शकतो, यात शंका नाही़ त्यामुळे अगदी उमेदवारी देतानाही राजकीय पक्षांना तरुण चेहऱ्यांचा विचार करावा लागणार आहे़
नवमतदारांत युवती अधिकउस्मानाबाद मतदारसंघात वाढलेल्या नवीन मतदारांमध्ये युवतींची संख्या १३ हजार ३८३ ने अधिक आहे़ एकूण नव्या मतदारांपैकी तब्बल ७२ हजार ७८९ इतकी संख्या युवतींची आहे़, तर तुलनेने युवकांची संख्या ५९ हजार ४०६ इतकी आहे़ त्यामुळे नारीशक्तीला दुर्लक्षून चालणारच नाही, असे दिसते़
परभणीत नवमतदारांना आकृष्ट करणाऱ्याचे पारडे जड
- अभिमन्यू कांबळे परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी २०१४ ची निवडणूक वगळता आतापर्यंत झालेल्या बहुतांश निवडणुकीत नव मतदारांनी शिवसेनेच्या विजयात हातभार लावल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीतही उमेदवारांचे भवितव्य नवमतदारांच्याच हाती असल्याचे संकेत आहेत़ गेल्या ४ निवडणुकीत विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचे अंतर हे सरासरी ५५ हजारांच्या आसपास राहिले आहे़ आता २०१९ च्या निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात नेमके ५५ हजार ५७९ मतदार वाढले आहेत़, हे लक्षणीय !
2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तुकाराम रेंगे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा ५६ हजार १७१ मतांनी पराभव केला होता़ २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा ६५ हजार ४१८ मतांनी पराभव केला होता़ २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होती़ त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा तब्बल १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता़
हिंगोलीत नवमतदारांवरच उमेदवारांची मदार- विजय पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघात नवमतदारांची संख्या जवळपास दीड लाखावर आहे. त्यामुळे एकूण संख्येच्या ८ ते १0 टक्क्यांपर्यंतच्या नवीन मतदारांचा कल निकाल बदलवणारा ठरू शकतो. हिंगोली लोकसभा मतदारसंघात १ जानेवारी २०१९ ची मतदारसंख्या १७ लाख १६ हजार ५४७ एवढी आहे. मागच्या लोकसभेला १५ लाख ६४ हजार एवढी मतदारसंख्या होती. त्यामुळे तब्बल १.५२ लाख नवीन मतदार यात आहेत. मयतांची संख्या वगळल्यास नवमतदारांचा टक्का यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नवीन मतदारांपर्यंत लोकसभा उमेदवारांना पोहोचावे लागणार आहे. २००९ च्या लोकसभेला सूर्यकांता पाटील यांना २ लाख ६६ हजार ५१४ वरच थांबावे लागले. शिवसेनेचे सुभाष वानखेडे ३ लाख ४0 हजार १४८ मते घेऊन विजयी झाले होते. यंदा नवमतदारांचा आकडाच दीड लाखावर आहे. त्यामुळे या मतदारांचा कलच लोकसभेतील विजयी चेहरा ठरविणार आहे. विशेष म्हणजे हा सर्व मतदार तरुण आहे. शासनाने वारंवार केलेल्या मतदार नोंदणीमुळे यात कदाचित काही तरुण नसलेलेही असू शकतात. 2004 साली सूर्यकांता पाटील यांना राष्ट्रवादीकडून उभ्या असताना ३ लाख २७ हजार ९४४ तर शिवसेनेकडून असलेले शिवाजी माने यांना ३ लाख १५ हजार ३९९ मते मिळाली होती. अवघ्या १२ हजार ५४५ मतांनी पाटील विजयी झाल्या होत्या.
२०१४ मध्ये थेट लढतकाँग्रेसचे राजीव सातव यांना ४ लाख ६७ हजार ३९७ तर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ मते मिळाली होती. केवळ १ हजार ६३२ मतांनी सातव विजयी झाले होते. म्हणजे सुमारे केवळ दीड हजार मतांच्या अगदी थोड्याथोडक्या मतांनी सातव यांनी बाजी मारली.
जालन्यात नवमतदारांना मतदानास आणणाऱ्यास लाभ
- संजय देशमुख जालना लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरात चालविलेल्या नवीन मतदार नोंदणी अभियानात जवळपास ६६ हजार ३४९ नवमतदारांची नोंद झाली आहे. या नवमतदारांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होईल, त्या पक्षाकडे निर्णायक आघाडी राहणार आहे. सुशिक्षित बेरोजगार, तरुण शेतकरी यांचा नवमतदारांमध्ये प्रामुख्याने सहभाग असून निवडणुकीचे कुतुहल आणि लोकशाहीवर असलेला विश्वास यातूनच या नवमतदारांची संख्या वाढल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. मतदान जास्तीत - जास्त व्हावे म्हणून नवमतदारांना प्राधान्य दिले जात आहे.
2004 मध्ये रावसाहेब दानवे व उत्तमसिंह पवार यांच्यात लढत झाली होती. त्यात, दानवे यांना ३ लाख ६९ हजार ६३० तर पवार यांना ३ लाख ८ हजार २९८ मते मिळाली होती. २००९ मध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे, अशी लढत झाली होती. दानवे यांना ३ लाख ५० हजार ७१० व काळे यांना ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. २०१४ मध्ये रावसाहेब दानवे विरुध्द विलास औताडे, अशी लढत झाली होती. यात दानवे यांना ५ लाख ९१ हजार ४२८, तर औताडे यांना ३ लाख ८२ हजार ६३० मते मिळाली होती.
नांदेडमध्ये अडीच लाख युवा ठरविणार मताधिक्य !
- विशाल सोनटक्के लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नवीन मतदारयादीनुसार २००९ च्या तुलनेत मतदारयादीत सुमारे २ लाख ६३ हजारांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. मागील ३ लोकसभा निवडणुकींची आकडेवारी पाहिली असता एक लाखापेक्षा कमी मताधिक्याने येथे उमेदवाराने बाजी मारल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील नवमतदार यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सातत्याने वर्चस्व राहिलेले आहे. यंदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची यंत्रणा कामाला लागलेली आहे. दुसरीकडे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपचा अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात २००४ मध्ये भाजपाचे डी. बी. पाटील २४ हजार ३३५ मताधिक्यांनी निवडून आलेले होते. डी. बी. पाटील यांना ३ लाख ६१ हजार २८२ मते पडली होती. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार भास्करराव पाटील खतगावकर यांना ३ लाख ३६ हजार ९४७ मतांवर समाधान मानावे लागले होते. भारिप बहुजन महासंघाचे सुरेश गायकवाड यांनी ४२ हजार ३०७ मते खेचल्याने याचा फटका काँग्रेस उमेदवाराला सोसावा लागला होता. २००४ मध्ये भाजपाकडे गेलेली ही जागा काँग्रेसने २००९ च्या निवडणुकीत खेचून घेतली.
2009 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या भास्करराव खतगावकर यांनी ३ लाख ४६ हजार ४०० मते घेत भाजपाच्या संभाजी पवार यांचा पराभव केला होता. पवार यांना २ लाख ७१ हजार ७८६ मते मिळाली होती, तर तिसऱ्या स्थानावर बहुजन समाज पार्टीचे महमद महबूल सलीम होते. त्यांना ८४ हजार ७४३ इतकी मते मिळाली होती. एकूणच मागील तिन्ही निवडणुकीत विजयी उमेदवारांचे मताधिक्य एक लाखाच्या आत राहिले आहे. या पार्श्वभूमीवर २००९ च्या तुलनेत मतदारसंघात २ लाख ६३ हजार ३३७ नवमतदारांची वाढ झाली असून, हे मतदारच या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.