स्वातंत्र्याची युवकांची संकल्पना - १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:02 AM2021-08-15T04:02:16+5:302021-08-15T04:02:16+5:30
अनिष्ट रुढीपरंपरापासून मुक्ती हवी 'स्त्री' अंतराळात गेली आहे. मात्र, देशात आजही तिच्यावर अनंत रुढीपरंपरांचे बंधने आहेत. शिक्षण, नोकरी,लग्न असे ...
अनिष्ट रुढीपरंपरापासून मुक्ती हवी
'स्त्री' अंतराळात गेली आहे. मात्र, देशात आजही तिच्यावर अनंत रुढीपरंपरांचे बंधने आहेत. शिक्षण, नोकरी,लग्न असे महत्त्वाचे सर्व निर्णय तिला मुक्तपणे घेता येत नाहीत. स्त्रियांची आणि पर्यायाने देशाची प्रगती रोखणाऱ्या अशा अनिष्ट रुढी आणि प्रथांचे बंधन तोडायला हवे. यातून मुक्ती मिळेल तेव्हाच स्त्री स्वतंत्र होईल. तिचे स्वातंत्र्य देशाच्या सामाजिक विकासाठी अत्यावश्यक आहे.
- दीपाली कुबेर-कदम
इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये
मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असावा, त्याच्या जीवनाचे निर्णय घ्यायला आणि जगायला. एकमेकांच्या स्वातंत्र्याचा संकोच आपण करू नये. माणूस म्हणून एकमेकांचा आदर करावा. शक्य असल्यास एकमेकांना संकटातून बाहेर पडण्यासाठी हात द्यावा. पण कोणत्याही कारणास्तव इतरांच्या जीवनाचे मालक होऊ नये. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचीही जाणीव आपल्याला असावी. माणसाच्या माणूस म्हणून पूर्ण विकास होण्यासाठी , त्याचं / तिचं स्वतंत्र असणं गरजेचं आहे.
- गजानन घुले
राज्यघटनेला अभिप्रेत स्वातंत्र्य असावे
जागतिकीकरणाच्या कचाट्यात आणि विज्ञानाच्या युगात सदृढ स्पर्धा गरजेची आहे. जर आपला देश आणि देशबांधव यांना सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत, तर स्वातंत्र्य या संकल्पनेला काही अर्थ नसेल. त्यामुळे आमच्या नव्या पिढीला सर्वांना शिक्षण, गरिबी निर्मूलन, सर्वांना समान हक्क, आणि घटनेला अभिप्रेत असलेले निधर्मी राष्ट्र निर्माण होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- राज दळेकर
युवकांच्या प्रतिभेचा वापर व्हावा
उच्चशिक्षित तरुण शैक्षणिक पात्रता असूनही नोकरीपासून वंचित आहे. सुशिक्षितांच्या शक्ती आणि क्षमतेच शासन पुरेपूर उपयोग करून घेत नाही. आजही शिक्षण, आरोग्य, निवारा हेच मूलभूत प्रश्न आहेत. यामुळे अनेक तरुण नैराश्यात जगत आहेत. यासाठी युवकांच्या हाती योग्य काम देऊन त्यांच्या प्रतिभेचा वापर करावा. त्यांना भविष्याच्या चिंतेतून मुक्त करावे.
- नामदेव कुळभाऊ, संशोधक विद्यार्थी