- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यभरात शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न सतत चर्चेत असतो. मात्र, औरंगाबाद तालुक्यातील मलकापूर येथील जि.प. शाळेत प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्यात येते. यादिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम घेण्यात येतात. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी शब्दसंचय, भाजीपाला पिकवणे, खेळ, चित्रकला, वस्तुकला, वाचनात पारंगत करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती उपक्रमशील शिक्षिका संगीता तळेगावकर यांनी दिली.
मलकापूर हे औरंगाबाद तालुक्यातील छोटे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अवघी ३३९ आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत २० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका कार्यरत आहेत. या शाळेचा चेहरामोहराच या शिक्षिकांनी बदलला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांमध्ये मलकापूरच्या शाळेचा समावेश होतो. मागील वर्षभरापासून शाळेत इंग्रजी सुधारण्यासाठी ‘अवर वर्ड बँक’चा प्रयोग राबविला जात आहे. या प्रयोगात विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी पाच इंग्रजी शब्द पाठांतरासाठी दिले जातात. घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना हे शब्द पाठ करावे लागतात. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या दिल्या जातात. या चिठ्ठ्यांवर विद्यार्थी पाठ केलेले शब्द लिहितात. चिठ्ठीच्या पाठीमागून स्वत:चे नाव लिहिले जाते.
या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये साठविल्या जातात. महिन्याच्या शेवटी या सर्व चिठ्ठ्यांचा, पाठ केलेल्या शब्दांचा आढावा घेतला जातो. त्यातून विद्यार्थी इंग्रजी भाषेविषयी अपडेट राहतात, असेही शिक्षिका संगीता तळेगावकर सांगतात. हा उपक्रम सातारा येथील शाळेत २०११ पासून राबविण्यात येत होता. मागील वर्षी संगीता तळेगावकर यांची मलकापूर शाळेत बदली झाली. त्याठिकाणीही हा उपक्रम सुरू केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रा कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्यात येते. यादिवशी विद्यार्थ्यांना वाचन उपक्रम, आर्ट आणि क्राफ्टच्या वस्तू बनविण्यास शिकवले जाते. याशिवाय इतरही उपक्रम घेतले जातात. शाळेच्या परिसरात शालेय पोषण आहारासाठी लागणाºया भाजीपाल्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग निर्माण केली आहे. यात टोमॅटो, वांग्यांसह इतर भाजीपाला लावण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना सकस दर्जाचा आहार मिळण्यासही मदत होत आहे. शाळेच्या प्रगतीविषयी गावकºयांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे तळेगावकर यांनी सांगितले.
बीटस्तरीय कला, क्रीडा महोत्सवात यशमलकापूर शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बीटस्तरीय ४५ शाळांच्या कला क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय सहभाग नोंदवला. यात वक्तृत्व, निबंध, समूहगीत स्पर्धेत पारितोषिक पटकावले. कबड्डी आणि लेझीम स्पर्धेत विद्यार्थी संख्या कमी पडत असल्यामुळे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत सहभाग नोंदवला. यातही उत्कृष्ट सादरीकरण करीत सर्वांची मने जिंकली असल्याचे शाळेच्या शिक्षिकांनी सांगितले. या शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांची मदत मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.