- विजय सरवदे
औरंगाबाद : बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकदम पाच आमदार एकनाथ शिंदेसोबत गेल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सेनेची पकड ढिली होऊ शकते. जि.प.मध्ये सध्याचे बलाबल गाठणेही सेनेला शक्य होणार नाही, असा कयास आहे. मात्र, आगामी जि.प. निवडणूक ही महाविकास आघाडीसोबत लढली जाईल. शिवाय, बंडखोर पाच आमदारांपैकी संदीपान भुमरे सोडले, तर उर्वरित आमदारांची ताकद ग्रामीण भागात शून्य आहे. तरीही जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सेनेला पूर्वीपेक्षा प्रचंड मेहन घ्यावी लागेल, यास सेनेच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले होते. त्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीपान भुमरे, वैजापूरचे आ. रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाट, मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल आणि कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत, आदींचा समावेश आहे. निवडणूक झाल्यानंतर सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार हे शिवसेनेत दाखल झाले. तथापि, सेनेच्या एकूण सहा आमदारांपैकी अलीकडे पाच आमदारांनी बंडखोरी करीत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे आता शिवसेनेकडे आ. उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे सध्याचे बलाबल राखणे अवघड आहे, अशी राजकीय पटलावर चर्चा आहे.
यासंदर्भात ग्रामीण भागातील सेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणतात की, ग्रामीण भागात उमेदवाराला न बघता शिवसेनेला मानणारे मतदार आहेत. आमदार जरी फुटलेले असले, तरी त्यांचा ग्राउंडरुटवर फारसा परिणाम झालेला नाही. मतदारांची श्रद्धा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पैठण, वैजापूर, औरंगाबाद, आदी ठिकाणी मेळावे घेतले होते. तेव्हा शंभर-पन्नास कार्यकर्ते मेळाव्याला हजर राहतील, असा विरोधकांनी अंदाज लावला होता. पण, मेळाव्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सांगतो आहे की, आजही शिवसेनेला मानणारे कार्यकर्ते कमी झालेले नाहीत.
जि.प.चे माजी शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेते व ग्रामीण पदाधिकारी संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. जि.प.ची निवडणूक ही महाविकास आघाडीसोबत लढणार असून, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले जाईल. सध्या फुटीर आमदार विद्यमान शिंदे सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी विकास कामांवर खर्च करत आहेत. याचाही फारसा परिणाम होणार नाही. कारण, या आमदारांना शिवसेनेने आणि शिवसेनेच्या मतदारांनीच निवडून दिले आहे. त्यामुळे ही विकासकामे शिवसेनेमुळेच होत आहेत, हा विश्वास आम्ही ग्रामीण भागात लोकांना पटवून देत आहोत.
जि.प.मधील पक्षीय बलाबलशिवसेना : १९काँग्रेस : १६राष्ट्रवादी काँग्रेस : २भाजप : २२अपक्ष : ३