रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती आहे. रेल्वे स्थानकांवर अशा घोषणा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण याचा अर्थ रेल्वेच्या वस्तू तुमच्या मालकीच्या आहेत आणि तुम्ही त्या तुमच्या घरीही नेऊ शकता असा होत नाही. परंतु असेही काही प्रवासी आहेत, ज्यांच्यामुळे रेल्वेच्या समोरील समस्या वाढल्या आहेत. असे काही प्रवासी आहेत जे प्रवासादरम्यान मिळालेली उशी, चादर, टॉवेल स्वतःचं समजतात. रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये उशा, चादर आणि टॉवेल सोबत घेऊन जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे त्रस्त आहे. प्रवाशांच्या या सवयीमुळे रेल्वेचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवासी केवळ चादर, ब्लँकेट, टॉवेल, उशीचे कव्हरच चोरत नाही, तर किटली, नळ, टॉयलेट मधील सामान, फ्लश पाईप्स देखील चोरतात. छत्तीसगढमधील बिलासपूर झोनच्या ट्रेन्समध्ये लोक मोठ्या प्रमाणात चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. बिलासपूर आणि दुर्ग येथून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये ब्लँकेट्स, चादरी, उशाचे कव्हर, फेस टॉवेल यांची सातत्यानं चोरी असल्याची माहिती समोर आलीये.
५५ लाखांचं नुकसान
बिलासपूर झोनमधून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे ट्रेनमधील उशा, ब्लँकेट, फेस टॉवेल, चादरी, ब्लँकेट अशा वस्तूंच्या चोरीमुळे रेल्वेला तब्बल ५५ लाखांचा फटका बसलाय. दै. भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार गेल्या चार महिन्यांत रेल्वेच्या सुमारे ५५ लाख ९७ हजार ४०६ रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. चार महिन्यांत १२८८६ फेस टॉवेल चोरीला गेले असून, त्यांची किंमत सुमारे ५५९३८१ रुपये आहे. दुसरीकडे, एसीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ४ महिन्यांत १८२०८ बेडशीट चोरल्या असून, त्यामुळे रेल्वेला २८१६२३१ रुपयांचा फटका बसलाय. तसंच चार महिन्यांत रेल्वे प्रवाशांकडून १९७६७ पिलो कव्हर्स चोरीला गेल्यानं रेल्वेचं १०१४८३७ रुपयांचं नुकसान झालंय. तसंच २७९६ ब्लँकेट्स चोरीला गेल्यानं रेल्वेला चार महिन्यांत ११७१९९९ रुपयांचा फटका बसलाय. तर ३१२ उशांच्या चोरीमुळे रेल्वेला ३४,९५६ रुपयांचा भुर्दंड सोसावा लागलाय.
का होतेय चोरी?
या चोरींच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई केली आहे. रेल्वेने मूळ दराच्या सुमारे ७५ टक्के दरानं कंत्राटदाराला ४१ लाख ९७ हजार ८४६ रुपयांचा दंड ठोठावलाय. विशेष म्हणजे रेल्वेनं ट्रेनमधील एसी अटेंडंटना कंत्राटी पद्धतीनं काम दिलंय. या कंत्राटी कंपन्यांना प्रत्येक ट्रेनसाठी ब्लँकेट, चादरी, उशा इत्यादी मोजून दिले जातात आणि परत घेतले जातात. मात्र कंत्राटदार कंपन्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे रेल्वेचं सातत्यानं नुकसान होतंय. कोच अटेंडंटचं कंत्राट घेणाऱ्या कंपन्या आपलं काम योग्यरित्या करत नसल्याचं समोर आलंय.
किती होते शिक्षा?
रेल्वेच्या सामानाची चोरी करणं कायद्यानं गुन्हा आहे. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा नुकसान केल्याबद्दल तुमच्यावर रेल्वे प्रॉपर्टी ॲक्ट १९६६ नुसार कारवाई केली जाऊ शकते. रेल्वेच्या मालमत्तेची चोरी किंवा नुकसान झाल्यास दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. यासाठी कमाल ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसंच जास्तीत जास्त दंड न्यायालयाद्वारे निश्चित केला जाऊ शकतो.